भाजपा सेनेशी दोन हात करण्यास उत्सुक
By admin | Published: January 14, 2016 12:12 AM2016-01-14T00:12:12+5:302016-01-14T00:20:30+5:30
पालिका निवडणुकीचे पडघम : शंभर जागा मिळवण्यासाठी राबवणार मोहीम
नाशिक : राज्यात सत्ता असल्यानंतरही धुसफूस असलेल्या भाजपा आणि शिवसेनेत पालिका निवडणुकीतही सामना रंगणार आहे. वर्षभराने होणाऱ्या पालिकेच्या निवडणुकीत भाजपाने स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय स्थानिक स्तरावर जाहीर केला असून, आता स्पर्धक कॉँग्रेस-राष्ट्रवादी आणि मनसे नाहीच तर शिवसेना असणार आहे, असे भाजपाच्या नेत्यांनी जाहीर केले आहे. विशेष म्हणजे आता संघटनात्मक निवडणुका पार पडताच पालिकेची शंभरहून अधिक जागा मिळवण्यासाठी हन्रेड प्लस मोहीमच राबविण्यात येणार आहे.
भाजपाच्या वतीने सध्या संघटनात्मक निवडणुका सुरू असून, मंगळवारी मध्य पश्चिम मंडल अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या वेळी ही माहिती देण्यात आली. सध्या पक्षाला चांगले दिवस असून, अन्य पक्षांतील अनेक जण पक्षात येत आहेत, असे सांगतानाच आता भाजपाचे लक्ष्य महापालिका निवडणुका असून, यंदा भाजपा कोणाशीही युती न करता निवडणूक लढवेल, असे माजी शहराध्यक्ष विजय साने यांनी सांगितले, तर प्रदेश प्रवक्ता सुहास फरांदे यांनी यंदा महापालिका निवडणुकीत भाजपाची स्पर्धा कॉँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेशी नसून थेट शिवसेनेशीच असणार असल्याचे सांगितले. शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी यांनी देशात आणि राज्यात भाजपाची सत्ता येत असताना महापालिकेत स्वबळावर सत्ता का येऊ शकत नाही, असा प्रश्न कार्यकर्त्यांना केला. गुजरातमध्ये महापालिका निवडणुकीत भाजपाला शंभरहून अधिक जागा मिळतात. अवघ्या आठ ते दहा जागा विरोधकांना मिळतात. मग, महाराष्ट्रात आणि विशेष करून नाशिकमध्ये भाजपाला ते का शक्य होऊ शकत नाही, असा प्रश्न त्यांनी केला.
भाजपाने या अगोदरच संघटनात्मक बांधणी केली असून, त्या अनुषंगाने ‘हंड्रेड प्लस’ म्हणजेच शंभरहून अधिक जागा मिळवण्याचे उद्दिष्ट पार पाडण्यासाठी मोहीम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यामुळे आता राज्यात सत्तेवर असतानादेखील एकमेकांच्या विरोधात सुंदोपसुंदी करणाऱ्या मित्रपक्षांमध्येच नाशिकमध्ये लढत होईल, असे दिसत आहे. (प्रतिनिधी)