लोकसभेच्या निवडणुका होणार मे महिन्यात? मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे कार्यक्रमात सूतोवाच
By धनंजय रिसोडकर | Published: January 30, 2024 04:14 PM2024-01-30T16:14:40+5:302024-01-30T16:15:42+5:30
मुनगंटीवार हे भाजपाचे राज्यातील वरिष्ठ फळीतील जुनेजाणते नेतृत्व
धनंजय रिसोडकर, लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक : लोकसभा निवडणुकांबाबत वेगवेगळ्या अटकळी, अंदाज बांधले जाण्यास गत वर्षाच्या अखेरपासूनच सुरुवात झाली आहे. त्यात प्रामुख्याने यंदा मार्चमध्येच निवडणुका लागण्याची शक्यता अधिक असल्याची चर्चा अद्यापही कायम आहे. मात्र, राज्याचे वन आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून अनवधानाने लोकसभा निवडणूका ‘मे महिन्यात’ घेण्यात येणार असल्याचे वाक्य निघून गेले. त्यानंतर त्यांनी विषय बदलवला असला तरी मुनगंटीवार हे भाजपाचे राज्यातील वरिष्ठ फळीतील जुनेजाणते नेतृत्व असल्याने त्यांच्याकडून सहजपणे निघालेले उद्गार खरे मानायचे झाल्यास लोकसभेच्या निवडणुका या मार्च किंवा एप्रिलमध्ये नव्हे तर यंदाच्या मे महिन्यात होणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.
तब्बल १८४ वर्षांची प्रदीर्घ परंपरा असलेल्या नाशिकच्या सार्वजनिक वाचनालय अर्थात सावानाच्या वतीने स्व.माधवराव लिमये यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी सावाना कार्यक्षम आमदार पुरस्कार दिला जातो. त्यात दोन वर्षांपासून बदल करीत सावानाने कार्यक्षम आमदार आणि कार्यक्षम खासदार असा पुरस्कार आलटून-पालटून एकेका वर्षाला देण्याचे जाहीर केले. त्यानुसार २०२२ चा कार्यक्षम आमदार पुरस्कार वन व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना तर २०२३ चा कार्यक्षम खासदार पुरस्कार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार पुरस्कार प्रदान करण्याचा सोहळा होता. मूळात विविध कारणांनी मुनगंटीवार यांचा नाशिक दौरा लांबणीवर पडत गेल्याने तो पुरस्कार देण्याचा मुहूर्त अखेर २ वर्षांनी २०२४ मध्ये आला. त्यात नाशिकला दाखल झालेल्या मुनगंटीवार यांच्या लागोपाठच्या उपक्रमांमुळे सोमवारी सायंकाळी ५.३० वाजता निर्धारीत असलेल्या कार्यक्रमाला त्यांना पोहोचण्यासच दोन तास उशीर होऊन सायंकाळचे ७.३० वाजले. तरी सावानाचे संत्रस्त पदाधिकारी आणि पुरस्काराच्या प्रायोजक असलेल्या स्व. माजी आमदार माधवराव लिमये यांच्या कन्या डॉ. शोभा नेर्लीकर या कार्यक्रमासाठी थांबून राहिल्या.