भाजपा आमदार खतप्रकल्पावर; महापौर गंगापूर धरणावर...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2016 11:22 PM2016-02-25T23:22:14+5:302016-02-25T23:37:03+5:30

एकमेकांवर कुरघोडी : नागरी समस्यांचे ‘राजकीय’ भांडवल; आगामी संघर्षाची नांदी

BJP MLA Khat Prakalpavar; Mayor Gangapur damn ...! | भाजपा आमदार खतप्रकल्पावर; महापौर गंगापूर धरणावर...!

भाजपा आमदार खतप्रकल्पावर; महापौर गंगापूर धरणावर...!

Next

नाशिक : गंगापूर धरणातून जायकवाडीसाठी पाणी पळविले जात असताना भाजपा आमदारांनी चुप्पी साधल्यानेच नाशिककरांना सद्यस्थितीत पाणीकपातीला सामोरे जावे लागत असल्याचा प्रचार महापालिकेतील सत्ताधारी मनसेसह भाजपाविरोधी पक्षांनी चालविला असताना गुरुवारी दुपारी भाजपा आमदारांनी पदाधिकाऱ्यांसह खतप्रकल्प गाठत त्याच्या दुरवस्थेबद्दल मनसेवर हल्ला चढविला. तर दुसरीकडे महापौरांनी पदाधिकाऱ्यांसह थेट गंगापूर धरणाकडे कूच करत पाणी परिस्थितीचा अंदाज घेत आणखी पाणीकपातीचे संकेत दिले. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उभयतांमध्ये आगामी काळात नागरी समस्यांचे ‘राजकीय’ भांडवल करत एकमेकांवर कुरघोडी करण्याचा ‘शो’ नाशिककरांना बघायला मिळणार आहे.
भाजपाचा विरोध डावलून आयुक्तांनी गेल्या सोमवार (दि. २२) पासून शहरात विभागवार जलशुद्धिकरणनिहाय आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यातच भाजपाविरोधी नगरसेवकांनी आता सोशल मीडियावरून नागरिकांना पाणीबचतीचे आवाहन करतानाच भाजपामुळेच नाशिककरांचे हक्काचे पाणी पळविण्यात आल्याची जाणीव करून देण्यास सुरुवात केली आहे.
आगामी महापालिका निवडणुकीत भाजपाला ‘पाणी’ हा प्रश्न मोठ्या प्रमाणावर छळणार असून त्याचा फटकाही बसण्याची शक्यता राजकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त केली जाऊ लागली आहे. त्यामुळे बावरलेल्या भाजपा आमदार व पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी दुपारी मनपाच्या खतप्रकल्पाकडे धाव घेत तेथील परिस्थितीची पाहणी केली. खतप्रकल्पाच्या दुरवस्थेला सत्ताधारी मनसेच जबाबदार असल्याचा आरोप भाजपा आमदारांनी केला. खतप्रकल्पाच्या समस्येबाबत आयुक्तांची भेट घेऊन त्याबाबत रान उठविण्याचेही संकेत भाजपाने दिले. भाजपाकडून मनसेविरोधी रणनीती आखली जात असतानाच सायंकाळी महापौर अशोक मुर्तडक यांनी पदाधिकाऱ्यांना सोबत घेत थेट गंगापूर धरण गाठले.

Web Title: BJP MLA Khat Prakalpavar; Mayor Gangapur damn ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.