भाजपा, मनसे, आघाडी हिट विकेट
By Admin | Published: February 8, 2017 01:07 AM2017-02-08T01:07:19+5:302017-02-08T01:07:32+5:30
आठ अधिकृत उमेदवारांची माघार ; ८२१ उमेदवार निवडणूक रिंंगणात
नाशिक : महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी मिळावी यासाठी जिवाचा आटापिटा केला जात असल्याचे दिसत असताना आता या निवडणुकीतून आठ प्रमुख पक्षांच्या अधिकृत उमेदवारांनी माघार घेतली आहे. यात कॉँग्रेस तीन, राष्ट्रवादीचे दोन, भाजपाचा एक आणि माकपाच्या एका उमेदवाराचा त्यात समावेश असून, या प्रभागात हे पक्ष निवडणुकीपूर्वीच ‘हिट विकेट’ने बाद झाले आहेत. दरम्यान, निवडणुकीत ४६१ उमेदवारांनी माघार घेतली असून, आता ८२१ उमेदवार रिंगणात आहेत. अर्थात, अनेक प्रभागात बंडखोरीचे पेव फुटले असून, सर्वाधिक बंडखोर भाजपासमोर असल्याचे दिसत आहे. पूर्व प्रभागातील प्रभाग क्रमांक १४ भाजपा उमेदवार अहमद काजी यांनी माघार घेतली. अन्य उमेदवार आपल्याला टाळून प्रचार करीत असल्याचा दावा करीत माघार घेतली, तर पंचवटीतील प्रभाग क्रमांक १ मधून कॉँग्रेसचे अधिकृत उमेदवार आणि माजी नगरसेवक वसंतराव मोराडे, ३ मधून गणेश ऊर्फ विपूल मंडलिक, तर प्रभाग क्रमांक ११ मधील आशा भंदुरे या तीन उमेदवारांनी माघार घेतली.
सविता दलवाणी या भाजपाच्या नगरसेवक होत्या, परंतु उमेदवारी मिळत नसल्याने त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यांना पक्षाने उमेदवारी दिली होती, परंतु तरीही त्यांनी माघार घेतली आहे. सिडकोतील प्रभाग क्रमांक २६ मध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार सचिन भोर यांनी माघार घेतली. भोर हे गेल्यावेळी माकपाचे उमेदवार होते, त्यांनी दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला होता, नंतर माफीनामा सादर करून पुन्हा माकपात प्रवेश केला. परंतु माकपाने त्यांना अधिकृत पक्षचिन्ह न देता पुरस्कृत करण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे ते नाराज झाले आणि माघार घेतली असे सांगण्यात आले. निवडणूक लढण्याआधीच या उमेदवारांनी माघार घेतल्याने संबंधितांना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, महापालिकेच्या रिंगणात एकूण १२८२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ६६ उमेदवारांनी सोमवारी माघार घेतली, तर मंगळवारी माघारीच्या अखेरच्या दिवशी ३९५ उमेदवारांनी माघार घेतली. एकूण ४६१ उमेदवारांनी माघार घेतल्याने ८२१ उमेदवार रिंगणात आहेत. विशेष म्हणजे अनेक ठिकाणी बंडखोरी टाळण्याचे प्रयत्न झाल्यानंतरही बंडखोेरीचे पेव मोठ्या प्रमाणात आहेत. सिडकोत प्रभाग क्रमांक २९ मध्ये अनेक घडामोडीनंतर शिवसेनेचे एबी फॉर्म दिलेले उमेदवार दीपक बडगुजर तसेच भूषण देवरे यांनी माघार घेतली.
सकाळपासून मोबाइल स्वीच आॅफ केलेल्या या दोन्ही उमेदवारांमुळे अधिकृत उमेदवारांचा जीव टांगणीला लागला होता. परंतु त्यांनी माघार घेताच त्यांचा जीव भांड्यात पडला. प्रभाग १२ मध्ये अशाच प्रकारे गिरीश पालवे या भाजपाच्या बंडखोराने माघार घेतली. प्रभाग १२ मध्ये भाजपाचे इच्छुक सुरेश पाटील तसेच प्रकाश दीक्षित, तर प्रभाग ७ मध्ये भाजपाचे माजी नगरसेवक मधुकर हिंगमिरे यांनी बंडखोरी केली आहे. या बंडखोरांविषयी दिवसभर चर्चा सुरू होती. (प्रतिनिधी)