स्वपक्षीय सरकारवर भाजपा खासदार नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 12:51 AM2018-05-12T00:51:41+5:302018-05-12T00:51:41+5:30

 BJP MPs angry over pro-liberation government | स्वपक्षीय सरकारवर भाजपा खासदार नाराज

स्वपक्षीय सरकारवर भाजपा खासदार नाराज

Next

नाशिक : गेल्या चार वर्षांपासून रखडलेल्या संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीवरील अशासकीय सदस्यांच्या नेमणुकीत भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांना डावलून ४० वर्र्षे ज्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाशी संघर्ष करावा लागला त्यांच्याच कार्यकर्त्यांची वर्णी लावल्याच्या कारणावरून भारतीय जनता पक्षाचे दिंडोरीचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण चांगलेच नाराज झाले असून, या समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नेमणूक झालेल्या पत्नी कलावती यांचा राजीनामा त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करून संजय गांधी निराधार समितीच बरखास्त करावी, असे साकडे थेट मुख्यमंत्र्यांना घातले आहे.
खासदार चव्हाण यांनी या नेमणुकीबाबत उचललेले पाऊल पाहता भाजपांतर्गत सारे काही आलबेल नसल्याचे द्योतक मानले जात असून, स्वत:च्या सरकारवरच त्यांनी व्यक्त केलेल्या नाराजीमुळे विविध शासकीय समित्यांवरील अशासकीय सदस्यांच्या नेमणुकीबाबत भाजपा कार्यकर्त्यांना डावलण्यात आल्याची भावना वाढीस लागली आहे. गेल्या आठवड्यात पालकमंत्री गिरीश महाजन यांनी नाशिक जिल्ह्णातील प्रत्येक तालुकानिहाय संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीचे अध्यक्ष व अशासकीय सदस्यांच्या नेमणुकांची शिफारस जिल्हाधिकाºयांकडे पाठविली होती. त्यात सुरगाणा तालुक्याच्या समितीच्या अध्यक्षपदी आमदार जे. पी. गावित यांची, तर अशासकीय सदस्य म्हणून नबू खानू गोरी, महंमद झिपा बेलीफ, श्रीमती कलावती हरिश्चंद्र चव्हाण, धर्मेंद्र पारसमल पगारिया, भिका हरी राठोड यांची नेमणूक करण्यात आली आहे. यातील कलावती चव्हाण या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या पत्नी आहेत. खासदार चव्हाण यांच्या लोकसभा मतदारसंघात सुरगाणा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. संजय गांधी निराधार अनुदान समितीवर अशासकीय सदस्यांच्या नेमणुका करताना खासदार चव्हाण यांना विश्वासात घेतले गेले नसल्याची त्यांची भावना झाली असून, कलावती चव्हाण वगळता अन्य अशासकीय सदस्य मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित असल्याचे पाहून चव्हाण नाराज झाले आहेत. सुरगाणा तालुक्यात वर्षानुवर्षे वर्चस्व असलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाशी राजकीय व वैचारिक पातळीवर भाजपाने गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष करत, पक्षासाठी प्रसंगी लाठ्याकाठ्या खाल्ल्या असतानाही त्यांना या समितीत डावलल्याची भावना खासदार चव्हाण यांच्या समर्थकांनी व्यक्त केल्याचे पाहून पत्नी कलावती चव्हाण यांच्या नेमणुकीचे पत्र हाती मिळताच चव्हाण यांनी त्यांचा राजीनामा जिल्हाधिकाºयांकडे सुपूर्द केला आहे.
थेट मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली नाराजी
यासंदर्भात खासदार चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठविले असून, त्यात म्हटले आहे की, कलावती हरिश्चंद्र चव्हाण यांची मागणी नसतानाही त्यांची सदस्य म्हणून या समितीवर नियुक्ती केलेली आहे, तरी सदरची नेमणूक रद्द करण्यात यावी कारण भारतीय कम्युनिस्ट पार्टीतील सदस्यांबरोबर काम करणे अत्यंत अवघड असून, सदरहू कम्युनिस्टांबरोबर मी गेल्या ४० वर्षांपासून लढत असून, सदरहू पक्ष आपल्या पक्षास कोणतेही सहकार्य करीत नसून मोठ्या प्रमाणावर नुकसान करीत आहे. अनेक कार्यकर्त्यांचा व जनतेचा बळी देऊन मालमत्तेचे नुकसान करीत असल्याने सदरची कमिटीच रद्द करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

Web Title:  BJP MPs angry over pro-liberation government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा