'शासन आपल्या दारी’पासून भाजप-राष्ट्रवादी दूर! शिंदे गटाने घेतला ताबा; फलकबाजीत वरचढ
By श्याम बागुल | Updated: July 13, 2023 21:03 IST2023-07-13T20:48:52+5:302023-07-13T21:03:12+5:30
पालकमंत्री दादा भुसे यांच्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम प्रतिष्ठेचा झाला आहे.

'शासन आपल्या दारी’पासून भाजप-राष्ट्रवादी दूर! शिंदे गटाने घेतला ताबा; फलकबाजीत वरचढ
नाशिक : राज्यात सत्तेवर असलेल्या सरकारमध्ये शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहभागी असले तरी, शनिवारी (दि.१५) नाशकात होणाऱ्या ‘शासन आपल्या दारी’च्या यशस्वीतेची जबाबदारी जणू काही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटावरच असल्याचे चित्र शहरात दिसू लागले असून, या कार्यक्रमाला लाभार्थी निश्चित करून त्यांना ने-आण करण्यापासून ते शहरभर फलकबाजी करण्यात शिंदे गटाने ताबा घेतला आहे. त्यामानाने भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादीच्या गोटात या उपक्रमाविषयी उदासिनताच दिसून आली आहे.
पालकमंत्री दादा भुसे यांच्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम प्रतिष्ठेचा झाला आहे. त्यासाठी त्यांनी वेळोवेळी शासकीय बैठका घेवून तयारीचा आढावा व सुक्ष्म नियोजनावर भर दिला आहे. कार्यक्रमास कोणतीही कमतरता राहू नये यासाठी भुसे यांचे ‘बॅक ऑफीस’ त्यावर लक्ष ठेवून आहेत. हा कार्यक्रम तसे पाहिले तर शासकीय असून, राज्यात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व अलिकडेच सत्तेत सहभागी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचाही त्यात सहभाग असणे अपेक्षित मानले गेले आहे. परंतु भुसे यांनी या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी बोलविलेल्या लोकप्रतिनिधींच्या बैठकीकडे भाजपा, राष्ट्रवादीच्या आमदारांनी पाठ फिरविण्याची घटना घडली आहे.