भाजप घेत नाही खंडण्या !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:14 AM2021-03-07T04:14:22+5:302021-03-07T04:14:22+5:30
नाशिक : अयोध्येतील राम मंदिरासाठी भाजप नव्हे तर विश्व हिंदू परिषद आणि राम जन्मभूमी न्यास निधी संकलन ...
नाशिक : अयोध्येतील राम मंदिरासाठी भाजप नव्हे तर विश्व हिंदू परिषद आणि राम जन्मभूमी न्यास निधी संकलन करत आहे. भाजप कार्यकर्ते केवळ निधी संकलनात मदत करत आहेत. तसेच हे निधी संकलन स्वैच्छिक असून, भाजप अन्य पक्षांप्रमाणे खंडण्या गोळा करत नाही, असे सांगत माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेनेला टोला लगावला. तसेच मास्कच्या विचारांबाबत माझे आणि मनसे अध्यक्षांचे मत जुळत असले तरी प्रस्तावित मनपाच्या युतीबाबत अजून प्रस्ताव आलेला नसून, तत्कालिन परिस्थितीनुसार निर्णय घेतला जाणार असल्याचे महाजन यांनी सांगितले.
नाशिक महानगरातील विविध भागात १६ जलकुंभांचे भूमिपूजन केल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत महाजन बोलत होते. शिवसेना नेते संजय राऊत यांनी महापालिकेत केलेली १०० प्लसची गर्जनादेखील पोकळच असल्याचे त्यांनी सांगितले. ते नुसतीच गर्जना करतात, करत काहीच नाहीत. यापूर्वीही उत्तर महाराष्ट्रातील चारही महापालिकांमध्ये शिवसेनेने पराभवाची चव चाखली आहे. तरीदेखील त्यांना काहीही गर्जना करायची असेल तर घोडामैदान जवळच असल्याचे सांगून माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेनेला एकप्रकारे आव्हानच दिले. तसेच येत्या मनपा निवडणुकीनंतरही भाजपलाच सत्ता मिळणार असल्याचा दावाही केला. केंद्राच्या माध्यमातून नाशिकला येणाऱ्या निओ मेट्रोसाठी झालेले सर्वेक्षण प्राथमिक स्वरुपाचे असल्याने त्याच्या आराखड्यात भविष्यात गरजेनुसार २-३ बदलदेखील होऊ शकतात, असेही महाजन यांनी सांगितले. साहित्य संमेलनाबाबत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य तो निर्णय संबंधितांनी घ्यावा, अशीच आमची भूमिका आहे. तसेच पेट्रोल, डिझेलवरील राज्य शासनाचा कर कमी व्हावा, अशी आमची मागणी असल्याचेही महाजन यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासमवेत भाजपचे नाशिक प्रभारी जयकुमार रावल, महापौर सतीश कुलकर्णी, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले, बाळासाहेब सानप, उपमहापौर भिकूबाई बागुल, गिरीश पालवे, लक्ष्मण सावजी, विजय साने, जगदीश पाटील, सतीश सोनवणे, प्रशांत जाधव, पवन भगूरकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
इन्फो
सरकार बदलल्याने निधीबाबत भेदभाव
केंद्रातील सरकार आणि फडणवीस मुख्यमंत्री असताना नाशिक शहरात मोठ्या वेगाने विकासकामे सुरु होती. मात्र, नवीन राज्य शासन आल्यापासून नाशिकला विकासकामांसाठी निधी देण्यात खंड पडला. सरकार बदलले की, निधी मिळण्यात थोडाफार भेदभाव होतच असतो. दीड वर्षांपासून निधीत हात आखडला असला, तरी केंद्र सरकार आणि महापालिकेच्या माध्यमातून अधिकाधिक वेगाने कामे पूर्णत्वाला नेली जातील, असेही महाजन यांनी सांगितले.
इन्फो
वाजेबाबत सारे काही संशयास्पद
अंबानींच्या घराजवळ स्फोटके तसेच त्यानंतर हिरेन मृत्यू प्रकरणाने राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असल्याचे पुरते सिद्ध झाले आहे. या संपूर्ण प्रकरणात पोलीस अधिकारी वाजे यांची भूमिका, त्यांचे हिरेन यांच्याशी झालेले संभाषण हे सारे काही अत्यंत संशयास्पद आहे. या प्रकरणात पोलीस यंत्रणा निष्क्रीय झाली असून, या घटनेने संपूर्ण पोलीस दलाचे मनोबल खच्ची झाल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढण्यासाठी ‘एनआयए’कडून चौकशी व्हावी, अशी आमची मागणी असल्याचेही महाजन यांनी सांगितले.