भारतरत्नचा मुद्दा भाजपने पळविला
By संजय पाठक | Published: October 18, 2019 01:59 AM2019-10-18T01:59:50+5:302019-10-18T02:02:08+5:30
ब्रिटिशकालीन लढ्यातील अग्रणी क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न देण्यासाठी प्रयत्न करण्याचे भाजपने जाहीरनाम्यात नमूद केले असून, त्यानिमित्ताने पुन्हा या मागणीला उजाळा मिळाला आहे. गेल्या काही वर्षांत शिवसेनेने हा मुद्दा हाती घेतला होता; मात्र विधानसभेच्या जाहीरनाम्यात तो भाजपने पळविला आहे.
नाशिक : ब्रिटिशकालीन लढ्यातील अग्रणी क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न देण्यासाठी प्रयत्न करण्याचे भाजपने जाहीरनाम्यात नमूद केले असून, त्यानिमित्ताने पुन्हा या मागणीला उजाळा मिळाला आहे. गेल्या काही वर्षांत शिवसेनेने हा मुद्दा हाती घेतला होता; मात्र विधानसभेच्या जाहीरनाम्यात तो भाजपने पळविला आहे.
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्यवीर सावरकरांचे योगदान अतुलनीय आहे; मात्र त्यांना सतत वादात ढकलण्याचे प्रयत्न राजकारण्यांनी केल्याची भावना सावरकरप्रेमींमध्ये आहे. अंदमानच्या जेलमधून सुटकेसाठीचा माफीनामा आणि अन्य कारणांवरून सावरकरांना वादात ठेवून त्यांच्या अन्य कार्याकडे आणि प्रतिभेकडे सतत दुर्लक्ष केले जात असल्याचीदेखील भावना व्यक्त केली जाते.
सावरकर हे क्रांतिकारकच नव्हे तर ते भाषातज्ज्ञ, कवी होते. शिवाय जातिअंत चळवळीचे त्यांचे कार्यदेखील महत्त्वाचे होते, असे समर्थक मानतात; परंतु त्यानंतरदेखील त्यांचा यथोचित राष्टÑपुरुष म्हणून गौरव होत नसल्याची खंतदेखील व्यक्त केली जाते. शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्षांनी हिंदुत्ववादी म्हणून त्यांना कायम मानाचे स्थान दिले असले तरी त्यांच्याकडूनदेखील सावरकरांची प्रतिमा उजागर करण्यासाठी फार प्रयत्न केले जात नसल्याची खंत बोलून दाखविली जात होती. गेल्या काही वर्षांत शिवसेनेने हा मुद्दा उचलला आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच खासदार संजय राऊत यांनी लोकसभा निवडणुकीत नाशिकच्या जवळपास सर्वच सभांमध्ये त्याचा उल्लेख करताना सावरकर यांना भारतरत्न मिळविण्यासाठी पाठपुरावा करू, असेही जाहीर केले; परंतु विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मात्र भाजपानेच हा मुद्दा पळवून आपल्या जाहीरनाम्यात घातला आहे.
क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले आणि स्वातंत्र्यवीर सावरकर या दोघांनाही भारतरत्न देण्याचा प्रयत्न करू, असे त्यात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे हिंदुत्ववादी सुखावले असले तरी वारंवार होणारी मागणी पूर्ण होणार काय याबाबत मात्र शंका उपस्थित केली जात आहे.
नाशिकमधूनही प्रयत्न
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न मिळावा यासाठी नाशिकच्या शिवसैनिक असलेल्या अॅड. नीलेश कुलकर्णी यांनी एक लाख नागरिकांच्या सह्या घेऊन पंतप्रधानांना निवेदन पाठविण्याचा संकल्प केला असला तरी दुर्दैवाने त्यांच्या अपघाती निधनानंतर संकल्प अर्धवट राहिला.
४सावरकरांच्या भगूर येथील वाड्याचे स्मारकात रूपांतर करण्यात आले आहे. अभिनव भारत संस्थेच्या कार्यालयाचेदेखील संवर्धन केले जात आहे. शिवाजी उद्यानाचे उद्घाटनही सावरकर यांच्या हस्ते करण्यात आले होते.