धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची वारंवार मागणी; पंकजा मुंडे स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 09:06 IST2025-02-10T09:05:40+5:302025-02-10T09:06:15+5:30
भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याविषयी आपली भूमिका मांडली आहे.

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची वारंवार मागणी; पंकजा मुंडे स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या...
BJP Pankaja Munde: बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि पवनचक्की खंडणी प्रकरणात होत असलेल्या गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी होत आहे. याबाबत आता भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी आपली भूमिका मांडली आहे. "बीडमधील संतोष देशमुख हत्याकांडाचा मी अनेकदा निषेधच केला आहे. संपूर्ण प्रकरण सरकार संवेदनशील पद्धतीने हाताळत असून, या प्रकरणातून धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायचा की नाही? हा निर्णय मुख्यमत्री व दोघे उपमुख्यमंत्रीच घेतील," असं मत पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलं आहे.
श्री स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्ट (दिंडोरी) तसेच कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कृषी महोत्सवाला भेट देण्यासाठी पंकजा मुंडे रविवारी नाशिक येथे गेल्या होत्या. त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, "आमदार सुरेश धस यांच्याशी माझे वैर नाही. गणेशोत्सवात वापरण्यात येणाऱ्या प्लास्टर ऑफ पॅरीस मूर्तीच्या अनुषंगाने आम्ही बैठक घेतली असून, विधी आणि न्याय विभागाचे मार्गदर्शन मागवले आहे. लवकरच याबाबत अंतिम निर्णय होईल," असेही त्या म्हणाल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस आहे. आपण त्यांना शुभेच्छा देणार काय? असा प्रश्न पंकजा मुंडे यांना केला असता आमच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी कायम असतील. ते लाडक्या बहिणींचे भाऊ आहे, असेही त्यांनी सांगितले.
बिल्डरांना दिला इशारा
बांधकाम करण्याआधी पर्यावरण विभागाची परवानगी लागते.
बांधकामाच्या आधी त्या ठिकाणी झाडे लावा अन्यथा कारवाईस सामोरे जा, असा इशाराच पंकजा मुंडे यांनी दिला. जनता मुंडे साहेबांवर प्रेम करणारी आहे. मला मुंडे साहेबांचा वारसा मिळाला म्हणून लोकांनी स्वीकारलं, अशी प्रांजळ कबुलीदेखील पंकजा मुंडे यांनी दिली.
प्रयागराजला जाणार
मी अंधश्रद्धाळू अजिबातच नाही. मात्र, मी श्रद्धाळू आहे. प्रयागराजमध्ये अनेक तपस्वी आले आहेत. त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी तिथे जायचे आहे. मात्र, काही लोक फक्त कुंभ पाहायला जातात. ग्रीन एनर्जीवर जास्तीत जास्त प्रकाश टाकण्याचा आमचा मानस असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले.