मनपाच्या भ्रष्टाचारात भाजपाही सहभागी

By admin | Published: February 13, 2017 12:21 AM2017-02-13T00:21:27+5:302017-02-13T00:21:41+5:30

जाहीरनाम्यात कबुली : सत्तेचा सोयिस्कर विसर

BJP participants in corruption in Municipal Corporation | मनपाच्या भ्रष्टाचारात भाजपाही सहभागी

मनपाच्या भ्रष्टाचारात भाजपाही सहभागी

Next

नाशिक : गत पंचवार्षिकमध्ये नाशिककरांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हाती काठावरची सत्ता सोपविल्यानंतर लागलीच मनसेच्या इंजिनला डबा जोडून सत्तेत सहभागी झालेल्या भाजपाने येत्या निवडणुकीत महापालिकेत भाजपाची सत्ता आल्यास मनपाचा कारभार भ्रष्टाचारमुक्त करण्याचे आश्वासन पक्षाच्या ध्येयनाम्यात देतानाच दुसरीकडे मनसेच्या काळात महापालिकेत भ्रष्टाचार झाल्याची कबुली देत, आपणही त्यात कधीकाळी सहभागी झाल्याचे मान्य केले आहे.
महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने ध्येयनामा जाहीर करून अन्य राजकीय पक्षांपेक्षा आघाडी घेतली असली तरी, या ध्येयनाम्यातील काही बाबी पक्षाच्याच भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या ठरल्या आहेत. महापालिकेत पारदर्शक प्रशासनाचे आश्वासन देताना भाजपाने म्हटले आहे की, आॅनलाइन प्रणाली सुरू करणार, सेवा हमी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणार, माहिती अधिकार काटेकोरपणे राबविणार, महापालिका भ्रष्टाचारमुक्त करणार, विकासकामांच्या निविदांच्या अंतिम देयकासंदर्भात सर्व आवश्यक कागदपत्रे महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करणार. अर्थातच भाजपाने ध्येयनाम्यात वचन दिलेल्या बाबींपैकी बऱ्याचशा गोष्टींची अंमलबजावणी महापालिकेत सुरू असून, त्यातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे महापालिका भ्रष्टाचारमुक्त करणार असे भाजपाने म्हटले आहे. त्यांच्या या म्हणण्याचा सरळ अर्थ असा निघतो की, सध्याच्या काळात व यापूर्वीच्या काळातही महापालिकेत भ्रष्टाचाराची बजबजपुरी झाली असून, भाजपा या भ्रष्टाचारापासून महापालिकेला मुक्त करणार आहे. तथापि, ध्येयनामा तयार करताना भाजपाला नेमका त्यांच्या सत्तेतील वाट्याचा विसर पडला आहे. नाशिक महापालिकेत कॉँगे्रसची राजवट संपुष्टात आल्यानंतर झालेल्या सत्तांतरात भाजपानेही महापालिकेची सत्ता भोगली आहे. सेनेचे वसंत गिते महापौर झाल्यानंतर उपमहापौर म्हणून सन २००७ ते ०९ या काळात सध्याचे भाजपाचे आमदार बाळासाहेब सानप हे भाजपाकडून महापालिकेच्या सत्तेत सहभागी झाले, तर त्यानंतर २००२ ते २००५ या काळात भाजपाच्या शोभना अहेर यांनीही उपमहापौर म्हणून कामकाज पाहिले आहे. २००५ ते २००७ या काळात तर भाजपाचे विद्यमान शहराध्यक्ष व आमदार बाळासाहेब सानप हे शहराचे प्रथम नागरिक म्हणून खुर्चीवर विराजमान झाले होते. (प्रतिनिधी)

Web Title: BJP participants in corruption in Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.