भाजपत रांग म्हणजे निष्ठावंतांनी पुन्हा वळकटी बांधावी!
By किरण अग्रवाल | Published: January 17, 2021 01:03 AM2021-01-17T01:03:37+5:302021-01-17T01:08:04+5:30
गिते, बागुल पक्ष सोडून गेले म्हणून काय झाले, भाजपत यायला रांगेत अनेकजण उभे आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याने संधीच्या प्रतीक्षेत असलेल्या पक्षातील निष्ठावंतांना पुन्हा घाम फुटणे स्वाभाविक ठरले आहे.
सारांश
रांगा कुठे नसतात, आपल्याकडे तर घासलेटच्या दुकानांसमोरही त्या असतात; त्यामुळे संधीच्या शोधात असणाऱ्यांची रांग भाजपच्या दारापुढे असेल तर त्यात विशेष काय? माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात त्याप्रमाणे त्यांच्या पक्षात येणारेही अनेकजण रांगेत असतीलच, त्याबद्दल शंका असण्याचे कारण नाही. प्रश्न इतकाच आहे, रांगेत उभ्या असणाऱ्यांची उपयोगिता लक्षात घेऊन त्यांना पक्षात घेणार, की पक्ष विस्तारायचा म्हणून गेल्यावेळेप्रमाणे येईल त्या सर्वांचीच भरती करून पक्षातील निष्ठावंतांना पुन्हा ताटकळवणार?
भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या अलीकडील नाशिक दौऱ्यातून सदरचा प्रश्न निर्माण झाल्याने पक्षांतर्गत चुळबुळ सुरू होऊन जाणे स्वाभाविक ठरले आहे; परपक्षातून आल्या-आल्या भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी बसवले गेलेले वसंत गिते व सुनील बागुल पक्ष सोडून गेल्याच्या संदर्भातून बोलताना फडणवीस यांनी आपल्याकडेही अनेकजण रांगेत असल्याचे सांगितले. याच दौऱ्यात अन्य पक्षांतील एक माजी आमदार फडणवीस यांना भेटल्याचे ह्यट्रेलरह्णही नाशिककरांना पाहावयास मिळाला, त्यामुळे दोनजण गेले असले तरी त्यापेक्षा अधिकजण आपल्याकडे येण्याच्या तयारीत आहेत असे त्यांनी सांगणे हा राजकीय शह-काटशहाचा भाग झाला, परंतु खरेच तसे होणार असेल तर पक्षातील निष्ठावंतांनी आतापासूनच आपल्या वळकट्या बांधून ठेवायला हरकत नसावी.
नाशिक महापालिकेच्या गेल्या निवडणुकीपूर्वी ह्यमनसेह्णमधून मोठा लोंढा भाजपत आला होता, त्यामुळे पक्षातील अनेकांच्या संधी हिरावल्या गेल्या. आता आणखी वर्षभरावर येऊन ठेपलेल्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गिते व बागुल पक्ष सोडून गेल्याने त्यांना जरा कुठे हायसे वाटत असताना व संधीची दारे किलकिली होऊ पाहताना खुद्द फडणवीस यांनीच दारासमोरील रांगेत अनेकजण असल्याचे जाहीरपणे संकेत देऊन टाकल्याने पक्षनिष्ठांच्या भुवया वक्री होणे क्रमप्राप्त ठरावे. अर्थात एक बरे झाले, पक्ष सोडून जाणारा इकडे असताना चांगला असतो आणि दुसरीकडे जातो म्हणून वाईट बनतो असे नाही याची स्पष्टता फडणवीस यांनी करून देऊन राजकीय प्रासंगिक कौशल्य व परिपक्वता काय असते याचाही प्रत्यय आणून दिला. तीच त्यांची जमेची बाब; पण या बऱ्यावाईटातील निरक्षिरता भरती प्रक्रियेनिमित्तही तपासली जात नाही हे खरे.
महत्त्वाचे म्हणजे फडणवीस यांच्याकडे आता मुख्यमंत्रिपद नाही ही वास्तविकता नाशिक महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी अद्यापही स्वीकारलेली दिसत नाही म्हणून की काय, कर्ज काढण्याच्या मागणीसाठी त्यांनी फडणवीस यांना भेटून गळ घातली व महापालिका आयुक्तांना तशा सूचना देण्याचे सांगितले. महापालिकेतील सत्ताधाऱ्यांसाठी हे इलेक्शन वर्ष आहे, त्यामुळे फक्त भूमिपूजने करून चालणार नाही तर कामे करून दाखवावी लागणार आहेत. त्यासाठी केंद्राच्या विविध योजनांतून निधी मिळविण्यासाठी फडणवीस यांची मध्यस्थी अपेक्षित धरणे ठीक आहे; परंतु कर्ज काढण्यासाठीही त्यांचा ह्यशब्दह्ण खर्ची घालण्याचा प्रयत्न झाला. हा सर्वस्वी स्थानिक स्थितीवर अवलंबून असणारा व स्थानिक स्वराज्य संस्थेतील निर्णय असताना त्यासाठी फडणवीसांना साकडे घालून महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी पुन्हा एकदा आपले निर्नायकत्व उघड करून दिले आहे.
महापालिकेसाठी शिवसेनेशीच लढतीचे संकेत
नाशकातील सार्वजनिक वाहतूक सुधारण्यासाठी म्हणून टायर बेस्ड मेट्रोचा प्रकल्प साकारण्याचे राज्यातील गेल्या सरकारने ठरविले होते. विधानसभा निवडणुकीच्यापूर्वी घाईगर्दीत त्याचे भूमिपूजन उरकून घेण्याचेही घाटत होते, पण ते राहिले. आता हा प्रकल्प शिवसेनेमुळे रखडल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. वस्तुतः महापालिकेत, राज्यात व केंद्रातही भाजपचेच सरकार असताना ते घडून येऊ शकले नाही. सध्या जिल्ह्याचे पालकत्व छगन भुजबळ यांच्या निमित्ताने राष्ट्रवादीकडे आहे, तेव्हा या रखडलेल्या प्रकल्पाच्या पूर्णत्वाची जबाबदारी त्यांच्याकडे जावी; पण फडणवीस यांनी त्याच्या विलंबाला शिवसेनेला जबाबदार धरले यावरून महापालिकेसाठी स्पर्धा कुणात आहे याचेच संकेत मिळावेत.