शिवसेनेतील कुरघोडींमुळे भाजपा तयारीत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 01:56 AM2019-03-09T01:56:36+5:302019-03-09T01:57:28+5:30
शिवसेनेची उमेदवारी मिळविण्यासाठी पक्षातील इच्छुकांनी कुरघोडीची रणनीती चालविल्याचे पाहता संभाव्य धोका टाळण्यासाठी नाशिकची जागा भाजपाकडे ओढून घेण्याकरीता हालचाली सुरू झाल्याचे समजते.
नाशिक : शिवसेनेची उमेदवारी मिळविण्यासाठी पक्षातील इच्छुकांनी कुरघोडीची रणनीती चालविल्याचे पाहता संभाव्य धोका टाळण्यासाठी नाशिकची जागा भाजपाकडे ओढून घेण्याकरीता हालचाली सुरू झाल्याचे समजते.
लोकसभा निवडणुकीत भाजपासोबत युती झाल्याने निवडणूक लढविण्यासाठी शिवसेनेकडून प्रत्येक मतदारसंघात एकाहून अधिक इच्छुक तयार झाले असून, अशा इच्छुकांच्या अंतर्गत गटबाजीचा पक्षाला फटका बसू नये म्हणून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भांडणे केल्यास भाजपाला जागा सोडू, असा इशारा दिल्याने नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी दावेदारी करणाऱ्यांना धडकी भरली आहे. मुळातच नाशिक लोकसभा मतदारसंघात भाजपाचे संख्याबळ अधिक असल्याने भाजपाही सदर जागा पदरात पाडून घेण्यास उत्सुक आहे.
शिवसेनेकडून विद्यमान खासदारासह चौघांनी दावेदारी
केली असून, प्रत्येकाने उमेदवारी मिळविण्यासाठी एकमेकांवर कुरघोडी चालविली आहे. अशा परिस्थितीत सामान्य सैनिक मात्र संभ्रमित झाला असून दुसरीकडे प्रत्येक इच्छुकाचा स्वतंत्र गट तयार होवून एकमेकांच्या विरोधात कागाळ्या सुरू झाल्या आहेत. पक्षांतर्गत सुरू असलेल्या या भांडणाचा लाभ विरोधी पक्षाला होण्याची भीती आहे. तसेही
नाशिक लोकसभा मतदारसंघाचा विचार करता भारतीय जनता पक्षाचे या मतदारसंघात वर्चस्व असून, शहरात त्यांचे तीन आमदार
आहेत तसेच ६६ नगरसेवक सध्या कार्यरत असून, भाजपाने याच बळावर नाशिक लोकसभेच्या जागेवर ते दावा चालविल्याच समजते. यापूर्वी डॉ. दौलतराव
अहेर हे भाजपाच्या तिकिटावर नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते. त्याचाही आधार यासाठी घेतला जात आहे. त्यामुळे शिवसेनेत उमेदवारीसाठी चालविलेल्या एकमेकांवरील कुरघोडीचा लाभ उचलण्यास भाजपाने हालचाली सुरू केल्या आहेत.
अन्य पर्यायांचा शोध
नाशिकप्रमाणे राज्यात अन्य ठिकाणीही असेच प्रकार सुरू झाल्याच्या तक्रारी उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचल्याने त्यांनी इच्छुकांना दम भरतांनाच थेट जागाच भाजपाला सोडण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या इच्छुकांना घाम फुटला असून, ठाकरे यांच्याकडे तिकिटासाठी फिल्डिंग लावण्यासाठी अन्य पर्यायांचा शोध सुरू झाला आहे.चंदना