देशातील आर्थिक मंदीला भाजपाच जबाबदार : संजय राऊत
By श्याम बागुल | Published: September 4, 2019 03:29 PM2019-09-04T15:29:52+5:302019-09-04T15:33:17+5:30
माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी साडेतीन वर्षापुर्वीच देशाच्या अर्थव्यवस्थेविषयी भाकित केले होते. ते आता खरे वाटू लागले असून, अॅटोमोबाईल, टेक्सटाईल, फार्मास्युटीकल, बांधकाम अशा अनेक क्षेत्रात मंदीचे सावट निर्माण झाले असून, रोजगाराचा प्रश्न आ वासून उभा आहे.
लोकमत न्युज नेटवर्क
नाशिक : देशात आर्थिक कोंडीत सापडला असून, मंदीमुळे बेरोजगारीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात कोणताही कमीपणा नको. तीन वर्षापुर्वीच्या नोटाबंदी व त्यापाठोपाठच्या जीएसटी लागू करण्याला शिवसेनेचा विरोध होता. त्यामुळे आता आलेल्या आर्थिक मंदीला भाजपाच जबाबदार असल्याचे स्पष्ट मत शिवसेनेचे प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. शिवसेना सत्तेत असली तरी, धोरणात्मक निर्णय घ्यायचा शिवसेनेला अधिकार नाही असा निर्वाळाही त्यांनी दिला.
खासदार संजय राऊत दोन दिवसांच्या नाशिक भेटीवर आले असून, उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी उपरोक्त मत व्यक्त केले. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी साडेतीन वर्षापुर्वीच देशाच्या अर्थव्यवस्थेविषयी भाकित केले होते. ते आता खरे वाटू लागले असून, अॅटोमोबाईल, टेक्सटाईल, फार्मास्युटीकल, बांधकाम अशा अनेक क्षेत्रात मंदीचे सावट निर्माण झाले असून, रोजगाराचा प्रश्न आ वासून उभा आहे. त्यामुळे सरकारने परिस्थिती सावरण्यासाठी लवकर पावले उचलणे गरजेचे आहे. तसे न झाल्यास सरकारने घेतलेले ३७० कलम रद्द करण्याचा तसेच राम मंदिरासारख्या प्रश्नांवरील निर्णयांना काही अर्थ राहणार नाही. या प्रश्नांपेक्षा लोकांना पोटाचा प्रश्न महत्वाचा वाटतो अशी पृष्टीही त्यांनी जोडली. शिवसेना सत्तेत सहभागी असली तरी, आमचा एकच मंत्री आहे. देशाचे धोरणे पंतप्रधान, अर्थमंत्री, गृहमंत्री, संरक्षणमंत्री, मनुष्यबळ विकासमंत्री ठरवित असतो. त्यामुळे देशापुढे निर्माण झालेल्या आर्थिक परिस्थितीशी शिवसेनेचा संबंध नाही, त्यासाठी भाजपाच जबाबदार असल्याचे खासदार राऊत म्हणाले.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-सेनेचा फार्म्युला ठरला असून, लोकसभा निवडणुकीपूर्वी वरळीतील हॉटेलमध्ये भाजपाचे राष्टÑीय अध्यक्ष अमीत शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात युतीचा फार्म्युला एकदा ठरला आहे. जागा वाटप व सत्तेत वाटा ‘फिफ्टी-फिफ्टी’ ठरलेले असून येत्या निवडणूकीत महाराष्टÑात युतीला ऐतिहासिक यश मिळेल याची खात्री वाटल्यानेच कॉँग्रेस-राष्टÑवादीचे तंजावर नेते पक्षांतर करीत असल्याचे खासदार राऊत यांनी सांगितले. या पक्षांतरात आमच्याकडे ‘वॉशिंग’ मशीन नसल्याने आम्ही प्रत्येकाला परखून घेत आहोत, त्याच बरोबर ज्या मतदार संघात पक्षाची कमकुवत परिस्थिती आहे, अशा पर्याय नसलेल्या मतदार संघातच अन्य पक्षातील व्यक्तींना आम्ही प्रवेश देत असल्याचे सांगून राऊत यांनी, गेल्या विधानसभा निवडणुकीच्या काळात कॉँग्रेस-राष्टÑवादीच्या २८ आमदारांनी सेनेत प्रवेश करण्याची तयारी दर्शविली होती परंतु स्थानिक सैनिकांचा विरोध असल्यामुळे सेनेने त्यांना प्रवेश नाकारला. हे सर्व जण भाजपात गेले व निवडून आले. त्यामुळे भाजपाला सेनेपेक्षा जास्त जागा मिळाल्या असा गौप्यस्फोटही त्यांनी केला. यावेळी शिवसेनेचे संपर्क नेते भाऊसाहेब चौधरी, खासदार हेमंत गोडसे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, अजय बोरस्ते, डी. जी. सुर्यवंशी, सुहास कांदे आदी उपस्थित होते.
चौकट====