उड्डाणपुलावरून भाजप- सेना आमने सामने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:11 AM2021-06-06T04:11:55+5:302021-06-06T04:11:55+5:30
महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्याने आता भाजप- सेनेत सरळ सामना रंगण्याची चिन्हे आहेत. महापालिका आयुक्तांनी सत्तारूढ भाजपचा कर्ज काढण्याचा प्रस्ताव ...
महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्याने आता भाजप- सेनेत सरळ सामना रंगण्याची चिन्हे आहेत.
महापालिका आयुक्तांनी सत्तारूढ भाजपचा कर्ज काढण्याचा प्रस्ताव फेटाळल्यानंतर महापौर सतीश कुलकर्णी कर्ज काढले नाही तर तात्पुरत्या स्वरूपात पूल रद्द करा आणि त्यासाठी असलेले अडीचशे कोटी रुपये नगरसेवकांच्या रस्ते आणि अन्य विकास कामांवर प्रभागात खर्च करा, अशी भूमिका घेतली हेाती. दरम्यान, या विरोधानंतरही महापालिकेच्या बांधकाम विभागाने उड्डाणपुलाच्या ठेेकेदाराला कार्यारंभ आदेश दिले होते.
गेल्या सोमवारी (दि.३१) महापालिकेच्या महासभेत यासंदर्भात पुन्हा वाद निर्माण झाला. त्यानंतर बडगुजर यांनी आताही भाजप दुटप्पी असल्याचा आरोप केला आहे. तर आता त्याला उत्तर देताना नूतन सभागृह नेते कमलेश बोडके यांनी उड्डाणपूल रद्द करण्याच्या मागणीसाठी सोमवारी (दि.७) आयुक्तांच्या दालनासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.
एका विशिष्ट प्रभागात उड्डाणपूल बांधण्यापेक्षा सर्वच प्रभागात अगदी १९९३ पासून रखडलेली डीपी रोडची कामे करावीत यासाठी या पुलांचे काम तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करावे, अशी मागणी केली होती. मात्र, बडगुजर यांचे या पुलात इतके स्वारस्य काय, अन्य प्रभागातील कामे बाजूला सारून आधी आपल्या प्रभागातील उड्डाणपूल साकारण्यासाठी इतका टाेकाचा आग्रह धरण्यामागील गौडबंगाल काय, असा प्रश्न महापौर सतीश कुलकर्णी यांनी बडगुजर यांना केला आहे.
कोट...
उड्डाणपुलांना कोणताही विरोध नाही. मात्र, सध्या सर्वच प्रभागातील कामे ठप्प झाली आहेत. नगरसेवकांची कामे होत नसल्याने अखेरच्या वर्षात प्रत्येक प्रभागात पाच कोटी रुपयांची कामे व्हावीत यासाठी तूर्तास उड्डाणपुलाच्या कामाची रक्कम या कामांसाठी वापरावी, हीच भूमिका आहे.
- सतीश कुलकर्णी, महापौर, नाशिक