फाटाफुटीच्या धास्तीने सहलीद्वारे भाजप-शिवसेनेची तटबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 12:52 AM2019-11-17T00:52:06+5:302019-11-17T00:52:56+5:30

महापौरपदाच्या निवडणुकीत संभाव्य फाटाफुटीची शक्यता लक्षात घेता बहुमत असतानाही नगरसेवकांची सहल काढून त्यांना सहलीसाठी नेण्याची नामुष्कीवर भाजपवर आली आहे, तर दुसरीकडे अशीच वेळ प्रमुख विरोधक असलेल्या शिवसेनेवरदेखील आली.

 BJP-Shiv Sena embankment on a journey through fear of partition | फाटाफुटीच्या धास्तीने सहलीद्वारे भाजप-शिवसेनेची तटबंदी

फाटाफुटीच्या धास्तीने सहलीद्वारे भाजप-शिवसेनेची तटबंदी

Next

नाशिक : महापौरपदाच्या निवडणुकीत संभाव्य फाटाफुटीची शक्यता लक्षात घेता बहुमत असतानाही नगरसेवकांची सहल काढून त्यांना सहलीसाठी नेण्याची नामुष्कीवर भाजपवर आली आहे, तर दुसरीकडे अशीच वेळ प्रमुख विरोधक असलेल्या शिवसेनेवरदेखील आली. त्यामुळे उभय पक्षांचे नगरसेवक शनिवारी (दि.१६) घाईघाईने रवाना करण्यात आले. अर्थातच, नगरसेवकांची जुळवाजुळव आणि त्यांना सहलीसाठी तयार करताना या पक्षांची बरीच दमछाक झाली. भाजपचे ४८ नगरसेवकच रवाना झाले आहेत.
महापौरपदाची निवडणूक येत्या शुक्रवारी (दि.२२) सकाळी ११ वाजता होणार असून, ही तारीख कळताच राजकीय हालचालींना वेग आला. विशेषत: भाजपला आव्हान देण्यासाठी महाशिवआघाडीचा प्रयोग नाशिक महापालिकेतदेखील करण्यात येणार असून, त्यासाठी भाजपने पुढाकार घेतला आहे. त्यामुळे भाजपला फाटाफुटीची धास्ती आहे. परंतु त्याचबरोबर शिवसेनेतील अनेक जण भाजपच्या गळाला लागल्याचे संबंधित सांगत असल्याने सेनेचीदेखील अवस्था फारशी चांगली नाही. त्यामुळेच सहलीद्वारे तटबंदी उभारावी लागली आहे.
भाजपतील इच्छुकांनी शुक्रवारी (दि.१५) मुंबईत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि अन्य नेत्यांच्या भेटीसाठी गेले होते. त्याचवेळी त्यांनी फाटाफूट टाळण्यासाठी भाजपच्या सर्व नगरसेवकांना अज्ञातस्थळी सहलीवर नेण्याचे आदेश दिले होते आणि त्याची जबाबदारी शहरातील सीमा हिरे, देवयानी फरांदे आणि अ‍ॅड. राहुल ढिकले यांच्यावर देण्यात आली आहे. त्यानुसार त्यांनी सकाळपासून धावपळ करून नगरसेवकांची जुळवाजुळव केली. कोणी टाळाटाळ तरी कोणी नाशिकमध्येच थांबणे आवश्यक असल्याचे सांगितले आणि सहलीस जाण्यास नकार दिला, त्यानंतर सकाळपासून नगरसेवकांना दहाची वेळ देण्यात आली असली तरी नगरसेवकांची जुळवाजुळव करण्यास धावपळ होत होती.
पंचवटीतील नगरसेवकांना हिरावाडीरोडवरील एका लॉन्सवर बोलविण्यात आले होते. महापौर रंजना भानसी, गटनेते जगदीश पाटील यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांनी पंचवटीवर लक्ष केंद्रित करीत नगरसेवकांना एकेक करीत जमविले, तर दुसरीकडे मध्य नाशिक मतदारसंघातील नगरसेवकांना वसंत स्मृती येथे बोलविण्यात आले होते. त्यांचीदेखील जमवाजमव  करण्यास काहीसा विलंब झाला, तर नाशिक पश्चिम मतदारसंघातील नगरसेवकांना त्रिमूर्ती चौकात बोलविण्यात आले होते. त्यांचीदेखील जमवाजमव करताना विलंब झाला. तिन्ही मतदारसंघातील नगरसेवक कार्यकर्ते पदाधिकारी असे सर्व जण राजीवनगर येथील युनिटी मैदानावर सर्व वाहनाने आले आणि त्यानंतर सर्वांना बसमध्ये बसवून सहलीसाठी रवाना करण्यात आले.
दरम्यान, भाजपच्या वतीने नगरसेवक सहलीवर जात असतानाच शिवसेनेच्या वतीनेदेखील महापौरपदाच्या निवडणुकीची हालचाल गतिमान झाली. विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते आणि गटनेता विलास शिंदे हे शुक्रवारी (दि.१५) शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना भेटण्यासाठी गेले होते. तेथील चर्चेत नाशिक महापालिकेत महाशिवआघाडी करण्याबाबत ग्रीन सिग्नल मिळताच हालचाली गतिमान झाल्या.
सर्व नगरसेवकांना निरोप देऊन पपया नर्सरीजवळ बोलविण्यात आले होते. जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, अजय बोरस्ते, विलास शिंदे, सुधाकर बडगुजर, माजी आमदार बाळासाहेब सानप, महानगरप्रमुख सचिन मराठे आणि महेश बडवे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
सर्व नगरसेवकांना बोलावून त्यांची हजेरी घेतल्यानंतर त्यांना सातपूरहून रवाना करण्यात आले. शिवसेनेचे एकूण ३१ नगरसेवक रवाना झाल्याची माहिती अजय बोरस्ते यांनी दिली.
महापौरपदासाठी शिवसेनेच्या वतीने सज्जता झाली असून, आता महापालिकेत सत्तांतर होणारच आहे. काहीही झाले तरी शिवसेनेचाच महापौर होणार आहे. शिवसेनेचे नगरसेवक फोडल्याची चर्चा कोणी करीत असतील तर त्यात कोणतेही तथ्य नाही.
- भाऊसाहेब चौधरी,
जिल्हा संपर्कप्रमुख, शिवसेना
नगरसेवकांची अशीही हजेरी...
सहलीवर जाण्यासाठी सर्व नगरसेवकांना काळजीपूर्वक बोलविण्यात आले होते. भाजपचे सर्व नगरसेवक युनिक मैदान येथे आल्यानंतर भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते आणि सुनील बागुल यांनी हजेरी घेतली, तर सातपूर येथे सर्व नगरसेवक आल्यानंतर शिवसेनेच्या वतीने स्वीकृत नगरसेवक तथा कार्यालयीन प्रमुख सुनील गोडसे यांनी सर्वांची हजेरी घेतली.

Web Title:  BJP-Shiv Sena embankment on a journey through fear of partition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.