निवडणूक पक्षादेशावरून भाजपात ठिणगी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:14 AM2021-03-06T04:14:19+5:302021-03-06T04:14:19+5:30
नाशिक- विषय समितींच्या निवडणुका राजकीयदृष्ट्या तितक्याशा महत्त्वाच्या मानल्या जात नसल्या तरी शिक्षण समितीच्या निवडणुकीत भाजपने मात्र गांभिर्याने घेत फाटाफुट ...
नाशिक- विषय समितींच्या निवडणुका राजकीयदृष्ट्या तितक्याशा महत्त्वाच्या मानल्या जात नसल्या तरी शिक्षण समितीच्या निवडणुकीत भाजपने मात्र गांभिर्याने घेत फाटाफुट टाळण्यासाठी पक्षादेश बजावले; परंतु व्हॉटस ॲपवर बजावलेल्या पक्षादेशाची प्रत्यक्षात प्रत देण्यावरून समितीचे सदस्य शिवाजी गांगुर्डे आणि गटनेता जगदीश पाटील यांच्यात वाद झाल्याचे समजते. त्यातून सभागृहात फक्त मतदार सदस्यांनाच अधिकार असल्याचे गांगुर्डे यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत वदवून घेत पाटील यांना सभागृहातून बाहेर जाण्यास भाग पाडले.
महापालिकेच्या शिक्षण समिती सभापती- उपसभापती पदाची निवडणूक शुक्रवारी (दि.५) सकाळी ११ वाजता महिला व बाल कल्याण समितीच्या सभागृहात जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी हा प्रकार घडला. या समितीत भाजपाचे बहुमत असले तरी कोणत्याही प्रकारे धोका पत्करून घेण्यास भाजप तयार नसल्याने गटनेता जगदीश पाटील यांनी सर्वांना गुरुवारी (दि.४) व्हॉटस ॲपवर पक्षादेश पाठवले होते. त्यानंतर बैठक सुरू झाल्यानंतर पाटील यांनी त्याठिकाणी जाऊन सर्वांना प्रत्यक्ष प्रत देणे सुरू केले; मात्र व्हॉटस ॲपवर अगोदरच व्हीप पाठवल्याने आता प्रत्यक्ष प्रत देऊन सही कशाला, असा शिवाजी गांगुर्डे यांचा प्रश्न होता; मात्र पाटील ऐकत नसल्याने अखेरीस गांगुर्डे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सभागृहात कोण केाण उपस्थित राहू शकतो, असा प्रश्न केला. त्यावर पाटील यांनी आपण गटनेता असून, व्हीप देण्यासाठी आलेा असल्याचा खुलासा केला; मात्र छाननीपर्यंतच थांबता येईल, असे यावेळी सांगण्यात आल्याने छाननी संपताच पाटील सभागृहाबाहेर आले.
या विषयावरून आता भाजपात जोरदार चर्चा सुरू झाली असून, वादाची ठिणगी पडली आहे. जर एकदा पक्षादेश दिला तर पुन्हा पुन्हा देण्याची गरज काय, असे गांगुर्डे यांचे म्हणणे असून, पाटील यांनी मात्र सर्व निवडणुकीत दक्षता घेण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.
केाट...
गटनेत्यांनी माझ्या व माझ्या मुलाच्या मोबाइलवर पक्षादेश पाठवला होता. मी बैठकीसही उपस्थित होतेा, असे असताना पुन्हा पत्र देऊन त्यावर स्वाक्षरी घेणे म्हणजे सदस्याच्या पक्षनिष्ठेवर शंका घेण्यासारखे आहे.
- शिवाजी गांगुर्डे, नगरसेवक भाजपा.
कोट...
काही निवडणुकीतून धडे मिळाले आहेत. यापूर्वी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराने माघार घेण्याचा प्रकार घडला होता. त्यामुळे आता सर्वच निवडणुका गांभीर्याने घेतल्या जात आहेत. काही अडचण नसेल तर पक्षादेश नाकारण्याचे कारण नव्हते.
- जगदीश पाटील, गटनेता, भाजपा.