भाजपाच्या स्टार शिलेदारांची ‘अग्निपरीक्षा’

By admin | Published: November 13, 2016 10:55 PM2016-11-13T22:55:33+5:302016-11-13T22:59:23+5:30

दोन उगलेंच्या लढतीकडे नजरा : विठ्ठल उगले यांच्यासमोर बाळू उगले यांचे आव्हान

BJP stalwarts 'fire test' | भाजपाच्या स्टार शिलेदारांची ‘अग्निपरीक्षा’

भाजपाच्या स्टार शिलेदारांची ‘अग्निपरीक्षा’

Next

 शैलेश कर्पे सिन्नर
माजी आमदार माणिकराव कोकाटे यांचे विश्वासू व कट्टर कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक विठ्ठल उगले यांच्यासमोर आमदार राजाभाऊ वाजे यांचे कार्यकर्ते माजी नगरसेवक बाळू उगले यांनी प्रभाग १ मध्ये कडवे आव्हान उभे केले आहे. दोघांमध्ये होणारी झुंज उत्सुकतेची तेवढीच भाजपाचे विठ्ठल उगले यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली आहे.
व्ही राजे या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून पुढे आलेल्या विठ्ठल उगले यांनी गेल्या ७-८ वर्षांत अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले. गेल्या निवडणुकीत त्यांनी नगरसेवक प्रमोद चोथवे या बलाढ्य उमेदवाराचा पराभव केल्याने पहिल्याच प्रयत्नात नगरसेवक झालेल्या विठ्ठल उगले यांच्या गळ्यात नगराध्यक्षपदाची माळ पडली होती. तरुण वयात विठ्ठल उगले यांना नगराध्यक्ष पद मिळाले होते. कडवा धरणातून राबविण्यात येत असलेल्या २४ तास पाणीपुरवठा योजनेत विठ्ठल उगले यांचा मोठा वाटा आहे. माजी आमदार कोकाटे यांच्या खांद्याला खांदा लावून उगले यांनी दिल्ली व मुंबई वाऱ्या करुन योजना अंतिम टप्प्यात आणून ठेवली आहे. विधानसभा निवडणुकीतही भाजपाचे उमेदवार कोकाटे यांची शहरातील प्रचाराची धुरा विठ्ठल उगले यांनी सांभाळली होती. गेल्या पाच वर्षांत शहरात राबविलेल्या कामांचे श्रेय हे जसे विठ्ठल उगले यांच्यासाठी जमेची बाजू असेल तसेच अनियमित पाणीपुरवठा, स्वच्छतेचा प्रश्न व अन्य असुविधांच्या बाबीतही त्यांनाच विरोधकांच्या टीकेला तोंड द्यावे लागणार आहे.
याउलट गेल्या पाच वर्षांपूर्वी नगरपालिकेच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही शिवसेनेचे उमेदवार बाळू उगले यांनी प्रभागातील जनसंपर्क कमी होऊ दिला नाही. अगदी झपाटल्यागत बाळू उगले यांनी संघटन उभे करुन मळहद्दीत आपल्या कामाचा बोलबाला केला. नगरपालिकेत चौदा महिन्यांच्या कालावधीत बाळू उगले यांनी कॉँग्रेसचे गटनेते म्हणून काम करतांना प्रभाव पाडला होता. त्यानंतर एकलव्य आदिवासी संघटना व शिवमुद्रा गु्रपच्या माध्यमातून बाळू उगले यांनी विविध समाजपयोगी कामे उभी केली आहे. निम्म्यारात्री कोणाच्याही मदतीला धावण्याचा बाळू उगले यांचा स्वभाव हीच त्यांची निवडणुकीतली ताकद आहे.
समाजोपयोगी कामे राबविण्यात भाजपा व शिवसेना या दोन्ही उगले उमेदवारांचा हातखंडा आहे. त्यामुळे मतदार या दोघांपैकी कोणत्या उमेदवाराला आपलेसे करतात हा शहरवासियांसाठी उत्सुकतेचा विषय ठरला आहे. उमेदवारांसह मतदारांची परीक्षा पाहणारी ही निवडणूक ठरणार आहे. या दोन तुल्यबळ उमेदवारांच्या लढतीत राष्ट्रवादी-कॉँग्रेस आघाडीने डॉ. प्रमोद रामराव लोहार या नवख्या उमेदवाराला निवडणूक रिंगणात उभे केले आहे. या लक्षवेधी लढतीत डॉ. लोहार मतदारांवर आपला कसा आणि किती प्रभाव टाकतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. सुशिक्षीत व बाराबलुतेदार संघटनेशी व राष्ट्रवादीचे काम करणाऱ्या डॉ. लोहार यांच्या उगले यांच्या तुल्यबळ व कडव्या झुंजीत कितपत टिकाव लागतो हे येणारा काळच सांगेल. प्रभाग १ ब मध्ये सर्वसाधारण जागेवर भाजपा व शिवसेना या दोन्ही उगले द्वयींमध्ये होत असलेली लढत सर्वांत कडवी व तुल्यबळ लढत मानली जात आहे. त्यात माजी नगराध्यक्ष भाजपाचे स्टार शिलेदार असल्याने पक्षाची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. (वार्ताहर)

Web Title: BJP stalwarts 'fire test'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.