भाजपा आमदाराच्या निवासस्थानी ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 12:13 AM2018-07-29T00:13:50+5:302018-07-29T00:14:06+5:30
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासह विविध मागण्यांसाठी मराठा क्र ांती मोर्चाने शनिवारी (दि.२८) पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब सानप यांच्या पंचवटीतील कृष्णनगर येथील निवासस्थानासमोर बोंबाबोंब व ठिय्या आंदोलन केले.
पंचवटी : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासह विविध मागण्यांसाठी मराठा क्र ांती मोर्चाने शनिवारी (दि.२८) पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब सानप यांच्या पंचवटीतील कृष्णनगर येथील निवासस्थानासमोर बोंबाबोंब व ठिय्या आंदोलन केले. सुमारे तासभर चाललेल्या आंदोलनानंतर बाळासाहेब सानप व महापौर रंजना भानसी यांनी आंदोलकांची भेट घेत चर्चा करून मराठा आरक्षणासाठी पाठपुरावा करण्यासह समाजाच्या विद्यार्थी वसतिगृहासाठी जागा देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी शनिवारचे आंदोलन स्थगित केले. मराठा क्र ांती मोर्चाने समाजाच्या विविध मागण्यांसाठी भाजपा सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यात मराठा क्र ांती मोर्चाचे आंदोलन सुरू आहे.
विद्यार्थी वसतिगृहासाठी ६० एकर जागा
मराठा क्रांती मोर्चाचे सत्ताधारी भाजपाचे शहराध्यक्ष तथा आमदार बाळासाहेब सानप यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन सुरू असताना महापौर रंजना भानसी व गटनेते संभाजी मोरुस्कर यांनीही आंदोलकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मराठा समाजाच्या विद्यार्थी वसतिगृहासाठी म्हसरूळ परिसरात जागा देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी येत्या महासभेत ठराव मांडण्याचे आश्वासन महापौर रंजना भानसी यांनी दिले आहे.