भाजपा अविश्वासावर ठाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 01:19 AM2018-08-31T01:19:01+5:302018-08-31T01:21:49+5:30

BJP strongly believes in unbelief | भाजपा अविश्वासावर ठाम

भाजपा अविश्वासावर ठाम

Next
ठळक मुद्देमहासभा होणारच : करकपातीची भूमिका सेना, कॉँग्रेसलाही अमान्य

नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर अविश्वास ठराव दाखल झाल्यानंतर शनिवारी (दि.१) विशेष महासभा होणार होत असतानाच मुंढे यांनी करकपात केली आहे. मात्र, त्यानंतरही भाजपा अविश्वास ठरावावर ठाम असून, सभागृहात योग्य ती भूमिका जाहीर करणार असल्याचे महापौर रंजना भानसी यांनी स्पष्ट केले आहे, तर शिवसेना आणि कॉँग्रेसने करकपात अमान्य केली आहे. वरिष्ठांकडून आदेश आल्यानंतर सेना भूमिका घेणार असून, कॉँग्रेसची बैठक शुक्रवारी (दि. ३१) होणार आहे.
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नाशिककरांवर करवाढ लादल्याचा ठपका ठेवत भाजपाने विरोधकांच्या मदतीने त्यांच्यावर अविश्वास ठराव आणला आहे. महासभेने संपूर्ण करवाढ रद्द करण्याचा ठराव केला असून, त्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी अन्य विरोधी पक्षांनीदेखील केली होती. दरम्यान, करवाढीसंदर्भात आयुक्तांनी गुरुवारी (दि.३०) पत्रकार परिषद घेतली आणि सुमारे पन्नास टक्के करवाढ रद्द केली. शेती क्षेत्रावर आणि मोकळ्या भूखंडावरील बोजाबाबत नगरसेवक टीका करीत असल्याने आयुक्तांनी पूर्वीप्रमाणेच यासंदर्भात दर ठेवले आहेत.
आयुक्तांच्या करकपातीने कोणत्याही पक्षाचे समाधान झाले नसल्याचे या पक्षांच्या भूमिकेवर स्पष्ट झाले आहे. नाशिककरांवर करवाढ नको या भूमिकेने भाजपाने अविश्वास ठराव दाखल केला असून त्याच भूमिकेवर ठाम असल्याने महापौर रंजना भानसी आणि सभागृह नेता दिनकर पाटील यांनी सांगितले.
शिवसेनेची भूमिका वरिष्ठ कळवणार
शिवसेनेने आयुक्त मुंढे यांना करवाढ संपूर्णत: रद्द करण्यासाठी अल्टिमेटम दिला होता, मात्र त्यांनी संपूर्ण करवाढ रद्द केलेली नाही, त्यांनी महासभेच्या ठरावाचा सन्मान करीत करवाढ रद्द करण्याची मागणी विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी केली आहे. करवाढीच्या विरोधात सर्वप्रथम शिवसेनेनेच भूमिका घेतली आणि सभागृहात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर महासभेने करवाढ रद्द करण्याचा ठराव केला. त्याची अंमलबजावणी व्हावी या मागणीवर ठाम असल्याचे बोरस्ते यांनी सांतिले.
शिवसेना नगरसेवकांची बैठक गुरुवारी (दि.३०) विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते व गटनेता विलास शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी आयुक्तांच्या अविश्वास ठरावाला बहुतांशी सर्व नगरसेवकांनी समर्थन दिल्याचे समजते. तथापि, यासंदर्भात पक्षाचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्यामार्फत वरिष्ठांना निर्णय कळविण्यात आला असून, त्यावर आता सभागृहातच भूमिका घोषित केली जाणार आहे.
ही मनमानीच आहे : खैरे
कॉँग्रेस पक्षाचे गटनेता शाहू खैरे यांनीदेखील करवाढ अमान्य असल्याचे सांगितले आहे. आयुक्त मुंढे यांनी करकपात केली असली तरी मान्य होऊ शकत नाही. मुळातच असित्वातील जुन्या मिळकतींना १८ टक्के करवाढीचा प्रस्ताव महासभेत मंजूर झाला असला तरी त्यालादेखील कॉँग्रेस पक्षाचा विरोधच होता. आताही जी वार्षिक भाडे मूल्यवाढ करून त्यात कपात करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला त्यात महासभेचा साधा उल्लेख ते करीत नाही. त्यांना वाटेल तेव्हा कर वाढविणार, वाटेल तेव्हा कमी करणार हे प्रकार चुकीचे असून, सभागृहाचा अवमान असल्याने हा प्रकार अमान्य असल्याचे खैरे यांनी सांगितले.
मनसेही भूमिका ठाम
महापालिका आयुक्तांनी अशाप्रकारे सोयीने कर कपात करणे हे चुकीचे आहे. महासभेने यासंदर्भात निर्णय दिला असून, त्यामुळे मनसे जनतेच्या बरोबरच राहील असे पक्षाचे गटनेता सलीम शेख यांनी सांगितले. दरम्यान, पक्षाची बैठक शुक्रवारी (दि.३१) होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने सभागृहातच भूमिका जाहीर केली जाईल, असे गटनेता गजानन शेलार यांनी सांगितले. माजी खासदार समीर भुजबळ शुक्रवारी (दि.३१) नाशिकमध्ये येणार आहेत. त्यानंतर पक्षाची भूिमका ठरेल, असे त्यांनी सांगितले. मुळात महापालिकेच्या सत्ताधारी पक्षाच्या सभापतींनी प्रस्तावावर सही केली नसून त्यामुळे भाजपा कितपत एक संघ आहे ते बघावे लागेल असेही ते म्हणाले.
दिनकर पाटील यांच्या पत्राने
भाजपात चलबिचल
आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर अविश्वास ठराव दाखल झाल्यानंतर भाजपा जोरात असल्याचे सांगितले जात असतानाच पालकमंत्री गिरीश महाजन यांनी हा विषय स्थानिक भाजपाने घाईघाईने हाताळल्याचे मत व्यक्त केल्याने आता स्थानिक स्तरावरही चलबिचल झाली आहे. सभागृह नेता दिनकर पाटील यांनी शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप व महापौर रंजना भानसी यांना उद्देशून लिहीलेली पोस्ट व्हायरल झाली असून त्यात माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे अस्थी विसर्जन करण्यात आले त्याच दिवशी आमदार बाळासाहेब सानप यांनी आपल्याला बोलावले व महापौर तसेच सानप यांनी पालकमंत्र्यांनी बैठक घेतली असून त्यांच्याशी झालेल्या चर्चेप्रमाणे अविश्वास ठरावाचे पत्र तयार केले. त्यावर सभापती, उपमहापौर आणि गटनेत्यांच्या सह्या आधी घेण्याचे मान्य केल्यानंतर पुढि कार्यवाही झाली असे नमुद करण्यात आले असून तुमच्या राजकारणाचा आणि तुमच्या राजकिय खेळीचा जनता आणि श्रेष्ठींसमोर आमच्या सारख्या कार्यकर्त्याचा बळी देऊ नये असे म्हंटले असल्याने गोंध निर्माण झाला आहे. अन्य पक्षात त्याबाबत चलबिचल सुरू झाली असून त्यामुळेच बहुतांशी पक्षांनी सभागृहातच भूमिका घेऊ असे स्पष्ट केल्याचे खासगीत सांगितले. आयुक्तांच्या विरोधात महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात आणि अविश्वास ठरावाच्या समर्थनार्थ भारतीय हित रक्षक सभेच्या वतीने महापौर आणि सभागृह नेते दिनकर पाटील यांचे समर्थन अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी केले.यावेळी सभेच्या वतीने महापौर भानसी यांना समर्थनाचे निवेदन देण्यात आले.

Web Title: BJP strongly believes in unbelief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.