स्थायी समितीसाठी भाजपत घमसान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:23 AM2021-02-23T04:23:00+5:302021-02-23T04:23:00+5:30
उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे स्थायी समितीतून भाजपचा एक सदस्य कमी करावा लागणार असून, आता या पक्षाचे आठ आणि विरोधकांचे आठ ...
उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे स्थायी समितीतून भाजपचा एक सदस्य कमी करावा लागणार असून, आता या पक्षाचे आठ आणि विरोधकांचे आठ असे समसमान बलाबल होणार आहे. त्यामुळे यंदा स्थायी समिती कोणाच्या ताब्यात जाणार याविषयी उत्कंठा आहे. येत्या बुधवारी (दि.२४) समितीचे आठ सदस्य नियुक्त करण्यासाठी विशेष महासभा दूरदृश्य प्रणालीने होणार आहे. त्यामुळे स्थायी समितीसारख्या मलाईदार समितीत शेवटच्या वर्षी तरी संधी मिळावी यासाठी सर्वच पक्षांत चुरस आहे. समिती ताब्यात राहण्यासाठी शिवसेनेशी टफ फाइट करावी लागणार आहे, असे निमित्त करून सध्या समितीचे विद्यमान सभापती गणेश गिते आणि माजी सभापती उद्धव निमसे यांच्यासह अनेक दावेदार पुढे आले आहेत. पक्षातील ज्येष्ठांमध्ये अरुण पवार आणि दिनकर आढाव यांचीही दावेदारी आहे, तर दुसरीकडे गिते आणि निमसे यांनाच जर समितीत संधी दिली जाणार असेल तर मग अन्य नगरसेवकांना एकच वर्ष स्थायी समितीत राहण्याची अट का, असा प्रश्न केला जात आहे. पक्षात दोन गट अत्यंत आक्रमक असून, त्याचे परिणाम स्थायी समितीच्या सदस्य निवडीनंतर दिसण्याची शक्यता आहे. शिवसेनेतदेखील जोरदार तयारी सुरू असून, अखेरच्या वर्षी तरी सामान्य नगरसेवकांना संधी द्यावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शिवसेनेत बागुल-गिते गटाचे समर्थक असलेल्यांनीदेखील आता उचल घेतली आहे. त्यामुळे शिवसेनेतही आता नवे-जुने सुरू झाले आहे.