सिन्नरच्या कामगारांना भाजपतर्फे मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 03:15 PM2020-03-31T15:15:36+5:302020-03-31T15:17:23+5:30
येथील माळेगाव एमआयडीसीमधील कामगारांना भाजपाच्या वतीने साहित्य पोहच करून मदत करण्यात आली.
सिन्नर : येथील माळेगाव एमआयडीसीमधील कामगारांना भाजपाच्या वतीने साहित्य पोहच करून मदत करण्यात आली.
माळेगाव औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत कामाला असलेल्या शुभम शहा या कामगाराने मुख्यमंत्री कार्यलयाचा हेल्पलाईन नंबर वर फोन करून मुख्यमंत्री शिवराज सिंग चव्हाण यांच्याशी संपर्क साधला. आम्ही महाराष्ट्रात सिन्नर या गावी अडकलो आहोत, आमच्याकडे जगण्यासाठी आवश्यक अन्नसाठा नाही. आम्हाला तत्काळ मदत मिळावी अशी विनंती केली होती. तेथील मुख्यमंत्री कार्यालयाने याची तत्काळ नोंद घेऊन भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र राज्य कार्यालयात संपर्क साधून गरजूंपर्यंत मदत पोचिवण्याची विनंती केली. सदर गोष्टींची दखल महाराष्ट्र राज्य भारतीय जनता पक्षाने घेतली. त्यानंतर प्रदेश पदाधिकारी लक्ष्मण सावजी यांनी सिन्नर तालुका अध्यक्ष बाळासाहेब हांडे यांना सदर प्रकरणाची माहिती दूरध्वनीवरून दिली व सदर व्यक्तीचे नाव,पत्ता, मोबाईल नंबर देऊन मदत करण्याचे कळविले. सदर गोष्टीची दखल घेत मोजक्या पदाधिकार्यांना घेऊन सरकारी मदत मिळेपर्यत काही दिवस पुरेल एवढे अन्न धान्य व औषधांची व्यवस्था केली. याबाबत सदर व्यक्तीने भाजपचे तालुकाध्यक्ष हांडे यांचे आभार मानले.