सहकारात भाजपाची मुसंडी, मात्र गटातटात अडकली गाडी
By admin | Published: May 22, 2015 01:32 AM2015-05-22T01:32:29+5:302015-05-22T01:32:29+5:30
सहकारात भाजपाची मुसंडी, मात्र गटातटात अडकली गाडी
गणेश धुरी
नाशिक : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत कधी नव्हे ते भाजपाचे अर्धा डझनभर आजी-माजी आमदार व खासदार निवडून आले. मात्र बॅँकेच्या निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या पॅनलरूपी गटातटात अडकल्याने भाजपाला सहकारात ‘अच्छे दिन’ येऊनही आता बॅँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी हायकमांडच्या कोर्टात चेंडू टोलवावा लागणार आहे. काही महिन्यांपूर्वीच भाजपावासी झालेले आमदार अपूर्व हिरे व अद्वय हिरे यांनी कर्मवीर भाऊसाहेब हिरे पॅनलची निर्मिती केली होती. त्यांच्या पॅनलला आमदार अपूर्व हिरे व कॉँग्रेसच्या माजीमंत्री डॉ. शोभा बच्छाव यांच्या रूपाने दोनच जागांवर समाधान मानावे लागले, तर माजी आमदार माणिकराव कोकाटे व माजी खासदार देवीदास पिंगळे यांच्या शेतकरी विकास पॅनलकडून भाजपा आमदार सीमा हिरे व खासदार हरिश्चंद्र चव्हाण निवडून आले. तसेच तालुका गटातून माजी आमदार माणिकराव कोकाटे व जि. प. सभापती केदा अहेर निवडून आले आहेत, तर क वर्गासाठी झालेल्या निवडणुकीत मनसेचे दिवंगत नेते उत्तमराव ढिकले यांचे चिरंजीव डॉ. सुनील ढिकले यांचा आमदार अपूर्व हिरे यांनी ६३ मतांनी पराभव केला. जिल्हा बॅँकेच्या एकूण २१ संचालकांमध्ये भाजपाचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार सीमा हिरे, आ. अपूर्व हिरे, माजी आमदार माणिकराव कोकाटे, अद्वय हिरे व जि. प. सभापती केदा अहेर, असे सहा संचालक निवडून आले आहेत. भाजपात प्रवेश केलेले माजी आमदार वसंत गिते यांचा शिवसेनेचे आमदार अनिल कदम यांनी आश्चर्यकारक पराभव केला. राष्ट्रवादीकडून माजी आमदार दिलीप बनकर तसेच माजी संचालक परवेज कोकणी, नरेंद्र दराडे, किशोर दराडे, गणपतराव पाटील, धनंजय पवार, सचिन सावंत, शिवाजी चुंबळे या आठ उमेदवारांनी विजय मिळविला असला तरी त्यातील दराडे बंधू हे पिंगळे-कोकाटे गटाकडे, तर चुंबळे हे ढिकले गटाकडे असल्याची चर्चा आहे. या निवडणुकीत माजी संचालक व माजी खासदार देवीदास पिंगळे यांच्यासह राजेंद्र भोसले, माजी आमदार वसंत गिते व अॅड. अनिल अहेर ही चौकडी पराभूत झाली, तर आमदार अनिल कदम, आमदार सीमा हिरे, आमदार अपूर्व हिरे, केदा अहेर, सचिन सावंत, किशोर दराडे, सचिन सावंत, सुहास कांदे, शिवाजी चुंबळे, नामदेव हलकंदर हे पहिल्यांदाच जिल्हा बॅँकेची पायरी चढणार आहेत. भाजपाला पहिल्यांदाच जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष पद मिळविण्याची संधी असली तरी अंतर्गत गटबाजीतून ही दोन्ही पदे राष्ट्रवादीकडे जाऊ शकतात. सेनेच्या आमदार अनिल कदम व सुहास कांदे यांच्या भूमिकाही महत्त्वाच्या ठरणार आहेत.