पश्चिम प्रभागात बंडखोरांमुळे भाजपा अडचणीत

By admin | Published: February 19, 2017 12:26 AM2017-02-19T00:26:17+5:302017-02-19T00:26:52+5:30

पश्चिम प्रभागात बंडखोरांमुळे भाजपा अडचणीत

The BJP is in trouble due to rebels in West division | पश्चिम प्रभागात बंडखोरांमुळे भाजपा अडचणीत

पश्चिम प्रभागात बंडखोरांमुळे भाजपा अडचणीत

Next

नाशिक : उचभ्रु वसाहतीमुळे भाजपाची मतपेढी मानल्या गेलेल्या पश्चिम विभागीय मतदारसंघात अवघे दोनच प्रभाग असून, आठ जागेंसाठी सारा खेळ रंगला आहे. भाजपाचे तीन उमेदवार याच मतदारसंघातून असतानाही कॉँग्रेस, शिवसेना आणि बंडखोरांनी दिलेल्या अडचणीमुळे भाजपाची डोकेदुखी वाढली आहे.  पश्चिम प्रभागात प्रभाग क्रमांक ७ आणि प्रभाग क्रमांक १२ असे दोन प्रमुख प्रभाग आहेत. मध्य नाशिक मतदारसंघातील हे दोन्ही प्रभाग असल्याने भाजपाचा वरचष्मा मानला जात असला तरी तिकीट वाटपातील घोळ आणि बंडखोर भाजपाला अडचणीचा ठरत आहे. गेल्या वेळी याच परिसराचा अंदाज घेतला तर गंगापूररोडचे दोन प्रभाग होते. म्हणजेच चार जागा होत्या. त्यापैकी देवयानी फरांदे, सीमा हिरे आणि डॉ. राहुल अहेर हे तीन भाजपाचे, तर शिवसेनेचे अजय बोरस्ते असे निवडून आले होते, तर सध्याच्या प्रभाग क्रमांक १२ चा विचार केला तर जुन्या अडीच प्रभागांचा मिळून तो बनला आहे. गेल्यावेळी कॉँग्रेसचे तीन आणि राष्ट्रवादीचे एक तर मुंबई नाका परिसरात मनसेचे दोन नगरसेवक होते. म्हणजे भाजपाचे अस्तित्व नव्हते.  यंदा प्रभाग क्रमांक सातमध्ये भाजपाचे तिन्ही नगरसेवक आमदार असल्याने त्यांच्या जागी दिलेल्या उमेदवारांना निवडून आणणे हा प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. या प्रभागात चार पैकी दोन उमेदवार आमदार सीमा हिरे आणि डॉ. राहुल अहेर यांच्या कुटुंबातील आहेत. तथापि, या प्रभागातून भाजपाचे माजी नगरसेवक मधुकर हिंगमिरे अडचणीत टाकणारे आहेत. त्यांना पक्षाने निलंबित केले असले तरी मुळातच पक्षातील त्यांच्यासारख्या अनेक नाराजांमुळे पक्षाला निवडणूक सोपी नाही. भाजपा आमदारांच्या प्रतिष्ठेच्या लढतीप्रमाणेच शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांना स्वत:सहीत चौघांना निवडून आणले तरच त्यांचे पुढील भवितव्य आहे.  प्रभाग १२ म्हटला तर तसा भाजपाच्या कमिटेड मतदारांचा म्हटला तरी १९९७ पासून आजवर या पक्षाला यश गवसले नाही. पक्ष संघटन आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या दोन्ही जमेच्या बाजू असल्या तरी पक्षाने यंदा जे चार उमेदवार दिले आहेत. त्यात एकही पक्षाचा जुना जाणता कार्यकर्ता नाही. सर्वच आयात उमेदवार आहेत. कॉँग्रेसचे तीन वेळा नगरसेवक असलेले शिवाजी गांगुर्डे भाजपातून उमेदवारी करीत आहेत, ही त्यांच्या दृष्टीने जमेची बाजू असली तरी कॉँग्रेसशी त्यांची काट्याची लढत आहे. त्यातच भाजपाची बंडखोरीदेखील पक्षाला अडचणीत टाकणारी आहे. त्यात गांगुर्डे यांच्या गटातील भाजपा बंडखोर किती मते खाणार यावर गांगुर्डे यांचे भवितव्य अवलंबून राहू शकते. दुसऱ्या गटातील भाजपाचे उमेदवार हेमंत धात्रक हेदेखील समीर कांबळे यांच्या कडव्या आव्हानाबरोबरच सुरेश पाटील यांच्या बंडखोरीमुळे त्रस्त आहेत. शिवसेनेचे काही प्रमाणात आव्हान असले तरी सध्या असलेले पक्षीय वातावरणच त्यांना तारू शकते.

Web Title: The BJP is in trouble due to rebels in West division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.