भाजपाकडून रिपाइंला ठेंगा
By admin | Published: February 4, 2017 01:39 AM2017-02-04T01:39:38+5:302017-02-04T01:39:49+5:30
चर्चेत गुंतविले : आता साथ देईल तोच मित्र
नाशिक : भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया आठवले गटाला मुंबईत सन्मानाने जागा मिळाल्या असल्या तरी नाशिकमध्ये मात्र रिपाइंला भाजपाच्या स्थानिक नेतृत्वाने ठेंगा दाखविला आहे. भाजपाने रिपाइंला अखेरच्या क्षणापर्यंत चर्चेत गुंतवून ठेवले. रिपाइंला एकही जागा न दिल्यामुळे नाशिकमधील भाजपाची युती तुटल्यातच जमा आहे. विशेष म्हणजे रिपाइं शिवसेनेकडे जाऊ नये यासाठी भाजपाने रिपाइंला शेवटपर्यंत झुलवत ठेवले.
रिपाइंची भाजपासोबत युती असल्यामुळे भाजपाच्या कोट्यातून रिपाइंला किमान ८ ते १० जागा मिळतील, अशी माफक अपेक्षा रिपाइंकडून व्यक्त केली जात होती. वास्तविक रिपाइंने २२ प्रभागांत तयारी केलेली असतानाही केवळ मित्रपक्षाकडून मिळणाऱ्या जागांवर समाधान मानण्याची भूमिका रिपाइंकडून घेण्यात आली होती. रिपांइला कोणत्या जागा सोडाव्यात याबाबत रिपाइंचे नेते आणि भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये तीन बैठकाही झाल्या. पालकमंत्र्यांबरोबरची महत्त्वपूर्ण बैठकही गुरुवारीच झालेली होती. त्यामुळे रिपाइंला जागा मिळण्याची आशा होती. मात्र भाजपाच्या गोटात रात्रीतून समीकरणे बदलली आणि रिपाइंला तिकिटाच्या यादीतून वगळण्यात आले. रिपाइंला याचा थांगपत्ता लागू न देण्याची पुरेपूर खबरदारी बाळगण्यात आली होती.
रिपाइंला नाराज न करता सेनेला शह देण्यासाठीच्या राजकारणात रिपाइंला मात्र ऐनवेळी बाजूला करण्यात आले. भाजापाने संपूर्ण लक्ष शिवसेनेला सुरुंग लावण्यासाठी केंद्रित केल्यामुळे ऐनवेळी भाजपाने रिपाइं टाळून पक्षात आलेल्यांना संधी देण्याला प्राधान्य दिले.
विशेष म्हणजे शिवसेनेच्या नाराजांना गळाला लावण्यासाठी भाजपाने दुसऱ्या पक्षातून भाजपात आलेल्या काही दिग्गज नेत्यांच्या माणसांचीही तिकिटे कापल्याचे वृत्त आहे. त्यामुळे भाजपाची यादी ऐनवळी बदलली गेल्याने पक्षांतर्गत नाराजीचा सूरही आता उमटू लागला आहे. दुसरीकडे भाजापाने रिपाइंला सपशेल बाजूला सारून रिपाइंची साथ सोडली आहे. त्यामुळे रिपाइंच्या कार्यकर्त्यांची भूमिका आता महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या गंभीर प्रकरणानंतरही रिपाइंकडून थेट भूमिका जाहीर करण्यात आली नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)