नाशिक मधील महायुतीच्या उमेदवाराच्या पराभवाची भाजपा करणार मिमांसा
By संजय पाठक | Updated: June 6, 2024 18:23 IST2024-06-06T18:22:51+5:302024-06-06T18:23:05+5:30
पंतप्रधानपदाच्या शपथविधीनंतर प्रदेश भाजपाची बैठक होणार असून, त्यात हा अहवाल सादर करण्यात येणार आहे.

नाशिक मधील महायुतीच्या उमेदवाराच्या पराभवाची भाजपा करणार मिमांसा
नाशिक : महायुतीचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यात दोन्ही ठिकाणी उमेदवारांचा पराभव झाला. त्यामुळे या पराभवाची मिमांसा होणार असून, नाशिक भाजपाकडून लवकरच अहवाल तयार करून तो पक्षाला सादर करण्यात येणार आहे. पंतप्रधानपदाच्या शपथविधीनंतर प्रदेश भाजपाची बैठक होणार असून, त्यात हा अहवाल सादर करण्यात येणार आहे.
नाशिक लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा क्षेत्र असून, त्यात भाजपाचे तीन, राष्ट्रवादीचे दोन आणि एक काँग्रेसचा आमदार आहे. नाशिकमध्ये गेल्या महापालिका पंचवार्षिक कारकिर्दीतील सुमारे १०१ आणि नगरपालिकांमधील अन्य असे सुमारे ११० नगरसेवक होते. संघटन बांधणीदेखील जोरात होती. तरीही महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांचा लाखाहून अधिक मतांनी पराभव झाला. दिंडोरीत तर भाजपाच्या उमेदवार तथा केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री डॉ. भारती पवार याच रिंगणात होत्या. तरीही त्यांचा पराभव झाला. या मतदारसंघात भाजपाचा एक आमदार असून, त्याचबरोबर राष्ट्रवादीचे मात्र चार आमदार आहेत तसेच शिंदेसेनेचा एक आमदार आहे. मात्र, त्यानंतरही डॉ. भारती पवार विजयी होऊ शकल्या नाहीत. विशेष म्हणजे दोन्ही मतदारसंघांसाठी भाजपाने सर्व व्यवस्था ताब्यात घेऊन व्यूहरचना केली हेाती. पक्षाचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे देखील नाशिकमध्ये तळ ठोकून होते. केंद्रातील सत्तेसाठी भाजपाने हा पुढाकार घेतला असला, तरी त्यात यश मिळाले नसल्याने आता भाजपाकडून या सर्व बाबी गांभीर्याने घेतल्या जात आहेत.