वेगळा विदर्भ हा भाजपाचाच अजेंडा
By admin | Published: May 27, 2015 11:58 PM2015-05-27T23:58:35+5:302015-05-28T00:07:30+5:30
शहांच्या विधानाचे भातखळकरांकडून खंडन
नाशिक : वेगळा विदर्भ हा पहिल्यापासूनच भाजपाचा अजेंडा राहिला असून, पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी केलेले विधान हे वैयक्तिक आहे. विधानसभेत सर्व मताने यावर निर्णय झाल्यास वेगळे विदर्भ राज्य प्रत्यक्षात येईल, असे मत प्रदेश सरचिटणीस अतुल भातखळकर यांनी व्यक्त केले. गेल्या दोन दिवसांपासून वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावरून शहा विरुद्ध राज्यातील नेते असा सामना बघावयास मिळत आहे.
पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी ‘भाजपाने स्वतंत्र विदर्भाचे कोणतेही आश्वासन दिले नव्हते’ असे सांगत वेगळ्या विदर्भाचा मुद्दा नेहमीच रेटून नेणाऱ्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धोबीपछाड दिला
होता. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शहा यांच्या विधानाचे खंडन करीत आम्ही नेहमीच वेगळ्या विदर्भासाठी आग्रही असल्याचे सांगितले होते.
त्यावर नाशिकमध्ये एका कार्यक्रमानिमित्त आलेल्या भातखळकर यांनीही दानवे यांच्याच सुरात सूर मिसळत शहा यांची वैयक्तिक भूमिका असल्याचे सांगत या विसंवादाला आणखी बळकटी दिली.
यावेळी भातखळकर म्हणाले की, १९९५ मध्ये जेव्हा एनडीए सरकार सत्तेत होते तेव्हा छत्तीसगड, उत्तराखंड, झारखंड या तीन नव्या राज्यांना मंजुरी दिली होती. त्यावेळेस विधानसभेने एकमताने निर्णय घ्यावा हे सूत्र अवलंबविले होते. हेच सूत्र राज्य शासनाने अवलंबविल्यास वेगळ्या विदर्भ राज्याचा प्रश्न मार्गी लागेल, असेही त्यांनी यावेळी
सांगितले.
दरम्यान, देशभर राबविल्या जाणाऱ्या जनकल्याण पर्वाबाबत बोलताना त्यांनी मोदी सरकार भ्रष्टाचारमुक्त व गतिमान प्रशासन देणारे सरकार असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)