सेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपाची मुसंडी
By admin | Published: February 24, 2017 12:07 AM2017-02-24T00:07:33+5:302017-02-24T00:07:46+5:30
सेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपाची मुसंडी
मालेगाव : तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सात गटांपैकी पाच गटात भाजपाचे कमळ फुलले आहे, तर शिवसेनेला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे. कळवाडी गटात झालेल्या काट्याच्या लढतीत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुहास कांदे यांच्या पत्नी अंजली कांदे व निमगाव गटातील मधुकर हिरे यांचा धक्कादायक पराभव झाल्याने शिवसेनेच्या नेत्यांवर आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. तर पंचायत समितीत मतदारांनी सेना व भाजपाला समान कौल दिला आहे. पंचायत समितीच्या सत्तेच्या चाव्या राष्ट्रवादी व अपक्ष म्हणून निवडून आलेल्या उमेदवारांच्या हातात आहेत.
गेल्या पंधरा वर्षांपासून मालेगाव पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. शिवसेनेची सत्ता अबाधित ठेवण्यासाठी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांना कसरत करावी लागणार आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेनेकडे चार जिल्हा परिषदेचे गट ताब्यात होते. मात्र यंदाच्या निवडणुकीत दाभाडी, रावळगाव, सौंदाणे, कळवाडी या सेनेच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडत आता भाजपाने या गटांमध्ये कमळ फुलविले आहे तर झोडगे गटावरील सत्ता अबाधित ठेवण्यास शिवसेनेला यश आले आहे तर वडनेर गटातील भाजपाच्या सत्तेला सुरुंग लागला आहे.
पंचायत समितीत मतदारांनी शिवसेनेला सहा व भाजपाला सहा असा समसमान कौल दिला आहे. पंचायत समितीवर सत्ता मिळविण्यासाठी लागणारा मॅजिक आकडा भाजपा व शिवसेनेकडे नसल्यामुळे मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. पंचायत समितीवर सत्ता मिळविण्यासाठी अपक्ष व राष्ट्रवादीच्या उमेदवाराची रसद लागणार आहे. ही रसद मिळविण्यासाठी भाजपा व शिवसेनेला मोठी कसरत करावी लागणार आहे. आमदार असताना दादा भुसे यांचा तालुक्यात करिष्मा चालत होता; मात्र आता ग्रामविकास राज्यमंत्री पद असताना गेल्या पंचवार्षिक निवडणुकीच्या तुलनेत यंदा शिवसेनेला जिल्हा परिषद गटातील एक जागा व पंचायत समितीची एक जागा गमावण्याची नामुष्की ओढावली तर कळवाडी, रावळगाव, निमगाव या गटातील शिवसेनेच्या उमेदवारांचा झालेला पराभव शिवसेना नेत्यांच्या जिव्हारी लागला आहे तर भाजपाने जोरदार मुसंडी मारत तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सात गटांपैकी पाच गटांमध्ये सत्ता खेचून आणली आहे. शिवसेनेला केवळ दोन गटांमध्ये सत्ता टिकविता आली तर पंचायत समितीत जनतेनेच समान कौल दिला आहे. भाजपा व शिवसेनेशिवाय मतदारांना पर्याय नसल्यामुळे समान कौलचा निकाल समोर आला आहे. कट्टर विरोधकाची भूमिका बजावणाऱ्या राजकीय पक्षाला यापुढे तालुक्यात चांगले दिवस येण्याची शक्यताच या निकालातून दिसून येत आहे.