भाजपाची प्रचाराची तयारी

By admin | Published: May 22, 2017 02:47 AM2017-05-22T02:47:13+5:302017-05-22T02:47:23+5:30

नाशिक : शिवसेनेशी सततचा संघर्ष आणि विरोधकांचे आरोप या पार्श्वभूमीवर भाजपाने आता पंडित दीनदयाळ उपाध्याय कार्यविस्तार योजना सुरू केली

BJP's campaigning ready | भाजपाची प्रचाराची तयारी

भाजपाची प्रचाराची तयारी

Next

 लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : शिवसेनेशी सततचा संघर्ष आणि विरोधकांचे आरोप या पार्श्वभूमीवर भाजपाने आता पंडित दीनदयाळ उपाध्याय कार्यविस्तार योजना सुरू केली असून, तळागाळातील नागरिकांशी संपर्क साधताना केंद्र तसेच राज्य सरकारने केलेल्या कामांचा डंका बजावण्याची तयारी करण्यात आली आहे. मध्यावधी झालीच तर त्यासाठी ही तयारी असल्याचे मानले जात आहेच, परंतु फारच टोकाचा निर्णय झाला, तर गुजरातबरोबरच महाराष्ट्रालाही निवडणूक परीक्षेला सामोरे जावे लागणार असल्याच्या संकेतांमुळे आमदारांनाही मतदारसंघ सांभाळावे लागणार आहेत. राज्यात सत्तेत असूनही शिवसेना आणि भाजपाचे सख्य नाही. शिवसेना वारंवार अडचणीत आणत असल्याने भाजपातही अस्वस्थता आहे. त्यादृष्टीने भाजपाने मध्यावधीची चाचपणी यापूर्वीच सुरू केली आहे. दोन दिवसांपूर्वी नाशिकमध्ये झालेल्या कृषी अधिवेशनात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही भाजपाने मध्यावधीसाठी सर्व्हे सुरू केल्याचे स्पष्ट शब्दात सांगितले होते.
भाजपाने पंडित दीनदयाल उपाध्याय विस्तार योजनेच्या माध्यमातून कार्य विस्तारच्या नावाखाली सरकारच्या कार्याचा प्रचार करून त्याला अप्रत्यक्ष पुष्टीच दिली आहे. शहराच्या विविध भागांतच नव्हे तर ग्रामीण भागात २५ मे ते १० जूनपर्यंत कार्यकर्ते तळ ठोकून बसणार असून, स्थानिक कार्यकर्ते आणि त्यांच्याबरोबरीने नागरिकांशी संपर्क साधून त्यांच्यापर्यंत विविध योजना पोहोचवणार आहेत. नाशिकमध्ये २४० कार्यकर्त्यांची कार्यशाळा अंबड येथील इंजिनिअरिंग क्लस्टर येथे घेण्यात आले. मुख्यमंत्र्यांचे कार्यासन अधिकारी श्रीकांत भारतीय यांनी खास सरकारी निर्णयांचा माहिती देणारे अभ्यासवर्ग घेतला.
मिळालेल्या माहितीनुसार भाजपाची ही मध्यावधीची तयारी आहे. मध्यावधीची वेळ आली तर अगोदरच विरोधकांनी उपस्थित केलेल्या आणि नागरिकांच्या मनातील प्रश्नांना उत्तरे देण्यात येणार आहेत. याशिवाय प्रसंगी गुजरातबरोबरच महाराष्ट्रातही मध्यावधीची ही पूर्वतयारी असल्याचे पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. अर्थातच, आमदारांना आता मतदारसंघाकडे लक्ष पुरवण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, त्या पार्श्वभूमीवर काही आमदारांनी पक्षीय जबाबदारीतून मुक्त करण्याच्या सूचनाही केल्या आहेत.

Web Title: BJP's campaigning ready

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.