आरक्षणाच्या मुद्द्यावरून सामाजिक तेढ निर्माण करण्याचे भाजपचे षडयंत्र; प्रकाश आंबेडकर यांचा आरोप
By प्रसाद गो.जोशी | Published: October 27, 2023 05:58 PM2023-10-27T17:58:43+5:302023-10-27T17:58:59+5:30
राज्यात एकनाथ शिंदे यांची शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी अशा तीन पक्षांची सत्ता असल्याने सध्या राज्यभरात गोंधळ निर्माण झाला आहे.
मालेगाव (नाशिक) : राज्यात एकनाथ शिंदे यांची शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी अशा तीन पक्षांची सत्ता असल्याने सध्या राज्यभरात गोंधळ निर्माण झाला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे - पाटील आंदोलन करीत आहेत. जरांगे- पाटील यांचे आंदोलन उभे राहिल्यानंतर धनगर, आदिवासी कोळी, ओबीसी समाजाला एकमेकांच्या विराेधात समोरासमोर उभे केले आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून सामाजिक तेढ निर्माण करण्याचे षडयंत्र भाजप सरकारकडून आखले जात आहे. आरएसएस संघटनेचा जातीयता, भांडणे वाढविणे, जाती - जातींमध्ये कलह निर्माण करणे, हा मुख्य अजेंडा असल्याचा आराेप वंचित बहुजन आघाडीचे डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
मालेगाव तालुका दौऱ्यावर असताना डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. डॉ. आंबेडकर म्हणाले की, हिंदू धर्मात वैदिक आणि संत परंपरा असे दोन भाग पडतात. त्यातील संतांच्या परंपरेवर चालणारा समाज माणुसकी व एकात्मता, एकमेकांचा मानसन्मान करण्यास शिकविते व वारीच्या माध्यमातून सहजीवनाचे दर्शन घडवून शांतीचा संदेश देणारा समाज आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर रस्त्यावर उतरणाराही समाज आहे. मनुस्मृतीवर आधारित असलेला वैदिक हिंदू समाज तेढ निर्माण करण्याचे काम करीत असल्याचा आरोप डॉ. आंबेडकर यांनी केला.
दिवाळीनंतर दंगली घडविण्याची शक्यता
राज्यात असलेले शिंदे सरकार बरखास्त करून पुन्हा सत्तेवर यायचे आहे. त्यासाठी हिंदू - मुस्लीम व अन्य समाजात आरक्षणाच्या मुद्द्यावरून आतापासून तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न भाजपाकडून केला जात आहे. त्यामुळे दिवाळीनंतर गोध्रासारख्या दंगली देशात घडू शकतात. यासाठी जनतेने आतापासून सरकारच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन डॉ. आंबेडकर यांनी केले.