भुजबळांच्या बालेकिल्ल्यात भाजपची निकराची लढाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:16 AM2021-08-29T04:16:59+5:302021-08-29T04:16:59+5:30

येवला : विधानसभा मतदारसंघात छगन भुजबळ यांच्या राजकीय प्रवेशाने मतदारसंघाचे राजकीय गणितच बदलले आहे. भुजबळ हाच पक्ष म्हणत राष्ट्रवादीने ...

BJP's decisive battle in Bhujbal's stronghold | भुजबळांच्या बालेकिल्ल्यात भाजपची निकराची लढाई

भुजबळांच्या बालेकिल्ल्यात भाजपची निकराची लढाई

Next

येवला : विधानसभा मतदारसंघात छगन भुजबळ यांच्या राजकीय प्रवेशाने मतदारसंघाचे राजकीय गणितच बदलले आहे. भुजबळ हाच पक्ष म्हणत राष्ट्रवादीने सेना-भाजपचा बालेकिल्ला आपल्या ताब्यात घेतला. विजयाची हॅट्ट्रिक साधत भुजबळ यांनी गेल्या तीन पंचवार्षिकपासून मतदारसंघावर आपला प्रभाव कायम राखला आहे. मात्र, भुजबळ यांच्याविना झालेल्या गत नगरपालिका निवडणुकीत पालिकेची सत्ता राष्ट्रवादीला टिकवता आली नाही. आता, होऊ घातलेल्या निवडणुकीत पालिकेवर कब्जा करण्यासाठी राष्ट्रवादीला भाजपसह अजून कोणाशी सामना करावा लागेल हे येणारा काळच ठरवणार आहे.

सन २०१४मध्ये भुजबळ यांनी सेनेच्या संभाजी पवार यांचा ४६ हजार ४४२ मतांनी पराभव केला होता. त्यानंतर भुजबळ तुरुंगात असताना २०१६ मध्ये झालेल्या नगरपालिका निवडणुकीची सूत्रे राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन नेते ॲड. माणिकराव शिंदे यांच्या हाती होती. या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी त्यांच्या पत्नी उषाताई शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली होती, तर सेना-भाजप युती असताना नगराध्यक्षपदासाठी भाजपच्या बंडू क्षीरसागर यांना उमेदवारी मिळाली होती. याबरोबरच काँग्रेसचे एजाज शेख, भारिप बहुजन महासंघाचे दीपक लाठे आणि दोघे अपक्ष असे एकूण सहा उमेदवार निवडणूक रिंगणात होते. या निवडणुकीत संभाजी पवार, किशोर दराडे, नरेंद्र दराडे, माजी आमदार कल्याणराव पाटील, श्रीकांत गायकवाड, आनंद शिंदे यांचे नेतृत्वाखाली सेना-भाजप युतीने ५७० मताधिक्क्याने नगराध्यक्षपद भाजपकडे खेचून आणले होते. बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने झालेल्या नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादीने १०, भाजपाने ४, शिवसेनेने ५ तर अपक्षांनी ५ जागांवर बाजी मारली होती.

नगराध्यक्ष क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेचा गेली चार वर्षे सर्वांच्या सहकार्याने सुरळीत कारभार चालू होता. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून उपनगराध्यक्ष सूरज पटणी यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय नगरसेवक विकासाच्या मुद्द्यावर एकत्र आले आणि नगराध्यक्षविरुद्ध इतर असे राजकारण गतिमान झाले आहे.

नगरपालिकेत भाजपचा नगराध्यक्ष असतानाही मतदारसंघातील पालिका म्हणून पालकमंत्री असणाऱ्या भुजबळ यांनी आपल्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यातूनच पालिकेची शहरातील विकासकामे झाली आहेत, काही होत आहेत तर काही होणार आहेत.

सध्या विकासकामांच्या उद्घाटन, भूमिपूजन व लोकार्पण अशा कार्यक्रमांचा पालकमंत्री भुजबळ यांनी शहरात सपाटा लावला असून, उपनगराध्यक्षांसह सर्वपक्षीय नगरसेवक भुजबळ यांच्या संपर्कात आहेत. राज्यात महाविकास आघाडी सरकार असल्याने सेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रितपणे नगरपालिका निवडणुका लढवतात का, की स्वतंत्रपणे यावर पुढील राजकीय गणित ठरणार आहे. सेनेचे संभाजी पवार आणि दराडे बंधू या आमदारद्वयींची भूमिकाही शहराच्या राजकारणात महत्त्वाची ठरणार आहे, तर राष्ट्रवादीपासून बाजूला गेलेले ॲड. शिंदे यांची भूमिकाही परिणामकारक ठरणारी आहे. भाजप, काँग्रेसने तर आत्तापासूनच स्वबळाची भाषा सुरू केली असून, राष्ट्रवादीनेही नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपले नियोजन सुरू केले आहे.

इन्फो

रखडलेले प्रश्न ऐरणीवर

पालकमंत्री भुजबळ यांनी प्रशासकीय मध्यवर्ती संकुल, तालुका क्रीडा संकुल, नाट्यगृह, पैठणी पर्यटन केंद्र, ट्रफिक पार्क, बोटिंग क्लब, अहल्यादेवी घाट, महामार्गाचा विस्तार, व्यापारी संकुल, मुक्तीभूमी स्मारक आदींच्या माध्यमातून शहराचा चेहरामोहराच बदलवला आहे. याबरोबरच तात्या टोपे स्मारक, शिवसृष्टीचेही काम होऊ घातले आहे तर शहरातील व्यापारी संकुल, भूमिगत गटार योजना, मूलभूत सुविधांचा अभाव, खंडित व अपुरा पाणीपुरवठा, बंद पथदीप, नववसाहतींतील गटार, रस्ते आदी रखडलेले प्रश्न येत्या निवडणुकीत ऐरणीवर राहणार आहेत.

कोट....

पालकमंत्री भुजबळ यांच्या सहकार्याने उपलब्ध झालेल्या निधीतून तसेच नगरपालिकेस प्राप्त झालेल्या वेगवेगळ्या अनुदानातून शहराचा प्रामाणिकपणे विकास करण्याचा प्रयत्न केला आहे. यात प्रामुख्याने रस्ते, गटारी, व्यायामशाळा, तात्या टोपे स्मारक, गार्डन, बाजारतळ काँक्रिटीकरण, बाजार ओटे व शेड, स्मशानभूमी विकास ही महत्त्वाची कामे आहेत.

- बंडू क्षीरसागर, नगराध्यक्ष

कोट...

शहराचा जो काही विकास शक्य झाला तो पालकमंत्री भुजबळ यांच्यामुळेच झाला आहे. पालिका सत्ताधाऱ्यांकडे विकासाची दृष्टी वा नियोजन नसल्याने शहरातील व्यापारी गाळे, रस्ते, नववसाहतींतील गटार व रस्ते हे प्रश्न आजही कायम आहेत. भूमिगत गटार, नियमित, शुद्ध व पुरेसा पाणीपुरवठा, मूलभूत सुविधा आदी प्रश्न रखडलेलेच आहे.

- प्रवीण बनकर, गटनेते, राकाँ

Web Title: BJP's decisive battle in Bhujbal's stronghold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.