भाजपाची दिंडोरीची उमेदवारी प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 01:45 AM2019-03-22T01:45:48+5:302019-03-22T01:46:09+5:30

दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून खासदारकीची हॅट्ट्रिक करणाऱ्या हरिश्चंद्र चव्हाण यांना भाजपाने घोषित केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत स्थान न मिळाल्याने त्यांचा पत्ता कापला जाणे निश्चित मानले जात आहे. दरम्यान, चव्हाण यांच्याऐवजी राष्ट्रवादीत डावलल्या गेलेल्या डॉ. भारती पवार यांना भाजपाचे तिकीट दिले जाण्याची शक्यता बळावली आहे़

BJP's Dindori candidature is pending | भाजपाची दिंडोरीची उमेदवारी प्रलंबित

भाजपाची दिंडोरीची उमेदवारी प्रलंबित

Next
ठळक मुद्देविद्यमानही ताटकळले : नवोदितांबाबतचा निर्णय लवकरच

नाशिक : दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून खासदारकीची हॅट्ट्रिक करणाऱ्या हरिश्चंद्र चव्हाण यांना भाजपाने घोषित केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत स्थान न मिळाल्याने त्यांचा पत्ता कापला जाणे निश्चित मानले जात आहे. दरम्यान, चव्हाण यांच्याऐवजी राष्ट्रवादीत डावलल्या गेलेल्या डॉ. भारती पवार यांना भाजपाचे तिकीट दिले जाण्याची शक्यता बळावली आहे़
युतीअंतर्गत जिल्ह्यातील नाशिकची जागा शिवसेनेकडून, तर दिंडोरीची जागा भाजपाकडून लढविली जात आहे. या दोन्ही जागांवर युती विरोधात लढणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने आपले उमेदवार घोषित करून दिल्याने सेना व भाजपाच्या उमेदवारांबाबत उत्सुकता लागून आहे; मात्र तीनवेळा खासदारकी भूषविलेल्या चव्हाण यांचा गुरुवारी घोषित झालेल्या भाजपाच्या पहिल्या यादीत नंबर लागू शकलेला नाही. त्यामुळे त्यांच्या नावाबाबत पक्षालाच आता खात्री उरली नसल्याचे संकेत मिळून गेले आहे. परिणामी विद्यमान खासदारांना उमेदवारीसाठी ताटकळण्याची वेळ तर आली आहेच शिवाय त्यांच्या जागी उमेदवारी मिळवू पाहणाऱ्यांबाबतचा निर्णयही अजून झालेला दिसत नसल्याने पक्ष कार्यकर्त्यांतील कुजबुज वाढून गेली आहे.
भाजपातर्फे केल्या गेलेल्या सर्वेक्षणात हरिश्चंद्र चव्हाण यांच्याबाबत यंदा सकारात्मक स्थिती आढळून न आल्याने त्यांचा पत्ता कापला जाण्याचे आडाखे अगोदरपासूनच बांधले जात होते. चव्हाण यांच्याऐवजी नाशिकच्या महापौर रंजना भानसी यांच्या नावाचा पर्याय म्हणून विचार केला जात होता; परंतु दरम्यानच्या काळात राष्ट्रवादीतर्फे गेल्यावेळी लढलेल्या व यंदाही प्रबळ दावेदार म्हणवलेल्या डॉ. भारती पवार यांची उमेदवारी कापून शिवसेनेतून आलेल्या धनराज महाले यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिल्याने भारती पवार यांनी भाजपाशी संधान साधल्याचे सांगितले जाते. पवार यांनी चालविलेली तयारी व त्यांचा स्थानिक लोकसंपर्क पाहता भाजपाकडून त्यांच्या नावाचा विचार केला जाण्याची चर्चा आता वाढून गेली असली तरी, त्यांचा भाजपा प्रवेश अद्याप घडून न आल्याने संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.
खरे तर अलीकडेच नाशकात झालेल्या उत्तर महाराष्ट्रातील युतीच्या पदाधिकाºयांच्या मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भारती पवार यांचा भाजपा प्रवेश होण्याचे अंदाज बांधले जात होते; परंतु तसे झाले नाही शिवाय, पहिल्या यादीतही त्यांचे नाव आले नाही त्यामुळे भाजपाकडून वेगळ्याच नावाचा विचार केला जातोय की काय, अशी शंकाही बळावून गेली आहे. अन्य पक्षांतील आयात उमेदवार घेण्याऐवजी व त्यास सर्वांचे सहकार्य लाभेल की नाही याची धाकधूक बाळगण्याऐवजी स्वपक्षातीलच कुणाला संधी देता येईल का याबाबत आता पक्षाकडून चाचपणी सुरू झाल्याचे सांगण्यात येत असले तरी अंतराअंतराने पक्षांतराचे धक्के देण्यासाठी पवार यांचे नाव मागे ठेवण्यात आले असून, लवकरच त्यांचा पक्ष प्रवेश घडून येण्याचेही बोलले जात आहे.
वेगळा विचार शक्य
उत्तर महाराष्ट्रातील आठपैकी सहा जागा भाजपातर्फे तर दोन जागा शिवसेनेकडून लढविल्या जाणे निश्चित आहे. यात भाजपाने पहिल्या यादीत सहापैकी चार जागांवरील उमेदवारांची घोषणा केली असून, दिंडोरी व जळगावचे उमेदवार घोषित होणे बाकी आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणच्या उमेदवारीबाबत वेगळ्या विचाराची शक्यता वाढून गेली आहे.

Web Title: BJP's Dindori candidature is pending

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.