धुळे महापालिकेवर फडकणार भाजपाचा झेंडा : सुभाष भामरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 07:18 PM2018-11-18T19:18:33+5:302018-11-18T19:21:51+5:30
गोटे-भामरे यांच्यातील ‘तु-तु मैं-मैं’ चव्हाट्यावर आल्यानंतर राजकिय वर्तुळात वेगळीच चर्चा रंगली होती. दरम्यान, गोटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन भामरे यांच्याविषयीचे आक्षेपही नोंदविले.
नाशिक : संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे व धुळ्याचे भाजपाचे आमदार अनिल गोटे यांच्यात वादविवाद सुरू होता. गोटे यांनी केलेल्या आरोपांविषयी बोलण्यास भामरे यांनी नापसंती दर्शविली; मात्र धुळे महापालिकेवर भाजपाचा झेंडा फडकणार असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.
गोटे-भामरे यांच्यातील ‘तु-तु मैं-मैं’ चव्हाट्यावर आल्यानंतर राजकिय वर्तुळात वेगळीच चर्चा रंगली होती. दरम्यान, गोटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन भामरे यांच्याविषयीचे आक्षेपही नोंदविले. गोटे आमदारपदाचा राजीनामा देणार नाही, असा खुलासाही फडणवीस यांनी त्यांच्या भेटीनंतर केला. नाशिकमध्ये एका कार्यक्रमासाठी आलेले भामरे यांना याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी स्मितहास्य करत धुळे महापालिकेत भाजपाचा झेंडा फडकणार असल्याचा विश्वास बोलून दाखविला. गोटे यांना निवडणुकीदरम्यान भामरे यांच्यासह अन्य नेते मदत करणार असल्याचेही फडणवीस यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे भामरे-गोटे यांच्या वादावर पडदा पडला असून भामरे यांनीही भाजपाची सत्ता महापालिकेत येणार असल्याचे बोलून दाखविल्यामुळे धुळ्यामधील भाजपाची अंतर्गत धुसफूस थांबणार असल्याचे चिन्हे सध्यातरी दिसू लागले आहेत.