ही तर भाजपाची नौटंकी : विरोधकांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 12:48 AM2018-09-01T00:48:17+5:302018-09-01T00:48:32+5:30
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या अविश्वास ठरावाबाबत ऐनवेळी घुमजाव रद्द करण्याची वेळ भाजपावर आल्यानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला. शिवसेनेने ही भाजपाची नौटंकी असल्याची टीका केली तर राष्टवादीने कारभार जमत नसल्याने भाजपाने आता पदाधिकारी बदलावे, अशी मागणी केली आहे.
नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या अविश्वास ठरावाबाबत ऐनवेळी घुमजाव रद्द करण्याची वेळ भाजपावर आल्यानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला. शिवसेनेने ही भाजपाची नौटंकी असल्याची टीका केली तर राष्टवादीने कारभार जमत नसल्याने भाजपाने आता पदाधिकारी बदलावे, अशी मागणी केली आहे. महापालिकेचे आयुक्ततुकाराम मुंढे यांनी ३१ मार्च रोजी वार्षिक भाडे मूल्य वाढविले तसेच मोकळ्या भूखंडांवरदेखील दर वाढविले. त्यामुळे शहरात आंदोलने उभी राहिल्यानंतर विशेष महासभा घेऊन संपूर्ण करवाढ रद्द करण्याचा ठराव करण्यात आला होता; परंतु हा ठरावच आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बेकायदेशीर ठरविला. त्यामुळे भाजपाने नाशिककरांवर करवाढीचा बोजा नको अशी भूमिका घेत आयुक्त मुंढे यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल केला होता; मात्र भाजपात श्रेष्ठींचे आदेश दिले की भूमिका बदलते असा अनुभव असल्याने विरोधकांनी भाजपाला आपल्या भूमिकेवर ठाम राहण्याचे आवाहन करून सर्वच पक्षांनी आपल्या पक्षाची भूमिका महासभेत ठरवू असे स्पष्ट केले होते. आयुक्त तुकाराम मुंढे यांनादेखील संपूर्ण करवाढ मागे घेतल्यास अविश्वास ठरावाला सामोरे जावे लागणार नाही अशी भूमिका सर्वपक्षीयांनी घेतली होती. त्यामुळे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सरासरी पन्नास टक्के करवाढ कमीदेखील केली; परंतु त्यानंतरही संपूर्ण करवाढ करावी अशी भाजपाची आणि सत्तारूढ गटाची मागणी होती. त्यामुळे अविश्वास ठराव मंजूर होणे अटळ असल्याचे मानले जात असताना ऐनवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांनी महापौरांना ठराव मागे घेण्याच्या सूचना केल्यामुळे त्यामुळे गोंधळ उडाला. शिवसेनेने यासंदर्भात भाजपावर टीका केली असून, भाजपाची ही नौटंकी असल्याचे नमूद केले आहे. विरोधी पक्ष नेता अजय बोरस्ते यांनी यासंदर्भात सांगितले की, सर्वसामान्य नागरिकांच्या करवाढीचा विषय हातात घेतला तर मग तो सुटला नसतानाच माघार का घेतली? भाजपाने अविश्वास ठराव आणल्यानंतर आता वरिष्ठ नेते तो मागे घ्यायला लावत असून, मग अगोदरच विचारणा करून अविश्वास ठराव का मांडला नाही? असा प्रश्न त्यांनी केला. आयुक्तांनी केलेली संपूर्ण करवाढ रद्द करावी ही शिवसेनेची मागणी असून, आयुक्तांनी ती पन्नास टक्के कमी केली. ही करकपात शिवसेनेला मान्य नसून शिवसेना शांत बसणार नाही, यासंदर्भात शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असून, तशी मागणी केल्याचे अजय बोरस्ते यांनी सांगितले.
राष्टÑवादीचे गटनेते गजानन शेलार यांनी भाजपाच्या वतीने विरोधी पक्षांचा विश्वासघात करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. भाजपा हा याप्रकारामुळे कलंकित झाला आहे. करवाढीच्या विरोधात राष्टÑवादी कॉँग्रेसदेखील आहे; परंतु आयुक्त मुंढे यांच्या विरोधात भाजपाने अविश्वास आणला तेव्हाच त्यांची विश्वासार्हता नव्हती. भाजपाने केवळ विरोधकांचा नव्हे तर नागरिकांचादेखील विश्वासघात केला असून, त्यामुळे आता भाजपाच्या नगरसेवकांनी खरे तर राजीनामे देऊन निवडणूक घेण्याची गरज आहे. किमान विद्यमान पदाधिकाºयांमध्ये बदल करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट नवनिर्माण सेनेचे गटनेता सलीम शेख यांनी शहरवासीयांवर करवाढ लादू नये यासाठी पक्षाची भूमिका कायम आहे. महापालिकेच्या महासभेत संपूर्ण करवाढ रद्द करण्याचा ठराव होऊन त्याप्रमाणेच अंमलबजावणी व्हावी, ही मागणी कायम आहे.
भाजपाचे मुंढे यांच्याशी साटेलोटे
महापालिका आयुक्तांचे भाजपाशी साटेलोटे असून, प्रत्यक्षात नागरिकांची दिशाभूल होत असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेता अजय बोरस्ते यांनी केला आहे. करवाढीच्या विरोधात भाजपाने अविश्वास ठराव दाखल केला आणि नंतर आयुक्तांनी पन्नास टक्के कपात केली. ती महासभेच्या ठरावानुसार शंभर टक्के नसतानाही भाजपाने अविश्वास ठराव मागे घेतला. म्हणजे करवाढीसारखी कामे आयुक्तांच्या हाती करून घेण्याचा भाजपाचा डाव असण्याची शक्यता आहे. सिडकोतील अतिक्रमणांबाबत आयुक्तांनी नोटिसा बजावल्या, त्यानंतर आमदार सीमा हिरे यांनी विरोध केला आणि कारवाई थांबली, याचा विचार करता मुंढे आणि भाजपा एकत्रित काम करीत असल्याचा आरोप बोरस्ते यांनी केला.
भाजपाचे घुमजाव नेहमीचेच : कॉँग्रेस
भाजपाने प्रत्येक प्रकरणात अशाप्रकारे घुमजाव करून विश्वासघात करण्याची परंपरा कायम ठेवली आहे, अशी टीका कॉँग्रेस गटनेता शाहू खैरे यांनी केली आहे. आयुक्त मुंढे यांनी अस्तित्वातील मिळकतींना दरवाढ केली तेव्हा कॉँग्रेसने बहिष्कार टाकला होता; मात्र त्यावेळीदेखील भाजपाने घुमजाव करीत १८ टक्के करवाढ केली होती. आता आयुक्तांनी नव्या मिळकतींसाठी केलेली दरवाढ कमी केली असली तरी शंभर टक्के कमी ेलेली नाही, अशावेळी भाजपा हे आयुक्तांच्या माध्यमातून खेळी करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.