पंचवटी प्रभाग सभापतिपदी भाजपचे मच्छिंद्र सानप बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:11 AM2021-07-20T04:11:54+5:302021-07-20T04:11:54+5:30
पंचवटी प्रभाग समिती सभापती पदासाठी आमदार सानप यांचे पुत्र मच्छिंद्र, नगरसेवक रुची कुंभारकर व पूनम सोनवणे या तिघांनी उमेदवारी ...
पंचवटी प्रभाग समिती सभापती पदासाठी आमदार सानप यांचे पुत्र मच्छिंद्र, नगरसेवक रुची कुंभारकर व पूनम सोनवणे या तिघांनी उमेदवारी अर्ज सादर केले होते. सोमवारी दुपारी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या सभापती निवडणूक प्रक्रियेत अर्ज माघारीअंती कुंभारकर व सोनवणे या दोघांनीही आपले अर्ज मागे घेतल्याने सानप यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे मांढरे यांनी घोषित केले.
यंदा पंचवार्षिक निवडणूक कालावधीत शेवटच्या टप्प्यात पुरुष नगरसेवकाला सभापती पदाची संधी देण्यात आली आहे. पंचवटीत भाजपचे सर्वाधिक सदस्य निवडून आल्याने प्रत्येक
नगरसेवकाच्या वाट्याला काही ना काही पद मिळाले होते. मात्र, सानप, कुंभारकर यांना कोणतेही पद मिळाले नव्हते. त्यामुळे यंदा पुरुष नगरसेवकांचा दावा होता त्यात सानप यांच्या गळ्यात सभापती पदाची माळ पडल्याने अखेर आजी-माजी आमदारांच्या लढाईत सानप अव्वल ठरल्याचे बोलले जात आहे.
कोट-
प्रभाग सभापती या नात्याने प्रभागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, आरोग्य, स्वच्छता यांचा पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावणार आहे. विकासकामे करतांना कोणत्याही प्रकारचा पक्षभेद न करता प्रामाणिकपणे विकासाला महत्त्व देणार आहे.
मच्छिंद्र सानप, प्रभाग समिती सभापती, पंचवटी