नाशकात मनसेची भाजपाला टाळी?
By admin | Published: March 7, 2017 02:24 AM2017-03-07T02:24:13+5:302017-03-07T02:24:28+5:30
नाशिक : मुंबईत शिवसेनेला हात पुढे करूनही टाळी न मिळालेल्या मनसेने नाशिकमध्ये बहुमतात असलेल्या भाजपाला टाळी देण्याची तयारी केली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
नाशिक : मुंबईत शिवसेनेला हात पुढे करूनही टाळी न मिळालेल्या मनसेने नाशिकमध्ये बहुमतात असलेल्या भाजपाला टाळी देण्याची तयारी केली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपाचे बळ वाढणार आहेच, शिवाय काही अपक्षही सहयोगी सदस्यत्व स्वीकारत सत्ताधारी बाकावर बसण्याची शक्यता आहे.मुंबई महापालिकेत सत्तापदांच्या स्पर्धेत मनसेची किंगमेकर होण्याची संधी भाजपाच्या पवित्र्यामुळे हुकली. निवडणुकीत भुईसपाट झालेल्या मनसेला संजीवनी बुटीची गरज निर्माण झाली आहे. नाशिक महापालिका निवडणुकीत मनसेचे अवघे ५ नगरसेवक निवडून आले आहेत. पूर्ण बहुमत प्राप्त केले असल्याने अपक्षांसह अन्य पक्षांचाही पाठिंबा घेण्याची कसरत भाजपाला करावी लागणार नाही. याऊलट, सत्ताधारी असलेल्या भाजपासोबत राहण्यातच आपले हित आहे, याची जाणीव मनसेसह काही अपक्षांना झाली आहे. त्यामुळेच, नाशिकमध्ये सत्ताधारी भाजपाला मनसेचा पाठिंबा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सन २०१२ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत मनसेचे ४० नगरसेवक निवडून आले होते. त्यावेळी मनसेची सत्ता येण्यासाठी भाजपानेच साथ दिली होती. पहिली अडीच वर्षे भाजपा मनसेसोबत सत्तेत होती. सतीश कुलकर्णी यांनी उपमहापौरपद भूषविले होते. पाच वर्षांपूर्वी मनसेला भाजपाने केलेल्या मदतीतून उतराई होण्याची हीच वेळ असल्याचे मनसेतील नेत्यांचे म्हणणे आहे.
याशिवाय, पाच वर्षे विरोधात बसण्यापेक्षा सत्ताधारी पक्षासोबत राहून आपली कामे करून घेणे अधिक हिताचे ठरेल, अशीही प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहे. त्यामुळे येत्या महापौर - उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवारांसाठी मनसेच्या पाचही सदस्यांचे बोटवर राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याबाबतचा निर्णय राज ठाकरे लवकरच जाहीर करतील, असेही सांगितले जात आहे. मनसेला भाजपाने टाळी दिल्यास प्रमुख विरोधी पक्षाची भूमिका निभावणाऱ्या शिवसेनेची कोंडी केली जाण्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. दरम्यान, महापालिकेत तीन अपक्ष नगरसेवक निवडून आले असून, त्यातील एकजण भाजपाचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारून पाठिंबा देण्याच्या तयारीत असल्याचे समजते.