विरोधकांची भाजपाला धोबीपछाड
By admin | Published: March 22, 2017 01:19 AM2017-03-22T01:19:12+5:302017-03-22T01:19:25+5:30
नाशिक : महापालिकेत भाजपाने भलेही ६६ जागा जिंकत बहुमत प्राप्त केले असले तरी प्रमुख अर्थवाहिनी मानल्या जाणाऱ्या स्थायी समितीची निर्विवाद सत्ता मिळविण्यासाठी दरवर्षी नशिबावर अवलंबून राहावे लागणार आहे.
नाशिक : महापालिकेत भाजपाने भलेही ६६ जागा जिंकत बहुमत प्राप्त केले असले तरी प्रमुख अर्थवाहिनी मानल्या जाणाऱ्या स्थायी समितीची निर्विवाद सत्ता मिळविण्यासाठी दरवर्षी नशिबावर अवलंबून राहावे लागणार आहे. सर्व विरोधी पक्षांनी उंटाची तिरकी चाल खेळत तीन अपक्ष व एक रिपाइं सदस्याच्या साथीने भाजपाला धोबीपछाड दिली आहे. स्थायी समितीवर १६ सदस्यांच्या रचनेत भाजपा ८ आणि सर्व विरोधक मिळून ८ असे समसमान बलाबल होऊन चिठ्ठी पद्धतीनेच सभापती विराजमान होणार आहे.
महापालिकेत भाजपा ६६, शिवसेना ३५, कॉँग्रेस ६, राष्ट्रवादी ६, मनसे ५, अपक्ष ३ आणि रिपाइं १ असे पक्षीय बलाबल आहे. भाजपाने स्पष्ट बहुमत मिळविल्याने भाजपाचाच महापौर व उपमहापौर विराजमान होऊ शकला. परंतु, महापालिकेत करारनाम्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी स्थायी समिती ताब्यात ठेवण्यास आता भाजपाला केवळ ‘राम’च वाचवू शकणार आहे. विरोधी पक्षांनी एकत्र येत भाजपाचा हा ब्लाइंड गेम केला आहे. प्रारंभी मनसेने अपक्ष सदस्य सय्यद मुशीर यांना सोबत घेत विभागीय आयुक्तांकडे गटनोंदणी करून घेतली, त्यानंतर शिवसेनेने रिपाइंच्या एकमेव सदस्या दीक्षा लोंढे यांना सोबत घेत गटनोंदणी केली. त्यापाठोपाठ मंगळवारी (दि.२१) कॉँग्रेसने मूळच्या कॉँग्रेसीच असलेल्या विमल पाटील यांना आपल्या गटात बरोबर घेतले, तर राष्ट्रवादीने अपक्ष सदस्य गुरुमित बग्गा यांना सोबत घेत गटनोंदणी करून घेतली. त्यामुळे महापालिकेत आता कलम ३१ अ अन्वये तौलनिक संख्याबळानुसार भाजपा ६६, शिवसेना ३६, कॉँग्रेस ७, राष्ट्रवादी ७ आणि मनसे ६ असे बलाबल राहील. स्थायी समितीवर एकूण १६ सदस्य तौलनिक संख्याबळानुसार नियुक्त करायचे असतात. एक सदस्य नियुक्तीसाठी ७.६२५ असा कोटा आहे.