पाणीवाटपाबाबत भाजपाची अडचण
By admin | Published: October 20, 2015 11:25 PM2015-10-20T23:25:26+5:302015-10-20T23:28:23+5:30
सर्वपक्षीय बैठकीकडे पाठ : पाणी न देण्यावर राजकीय पक्ष ठाम
नाशिक : गंगापूर धरणातील १.३३ टीएमसी पाणी मराठवाड्यातील जायकवाडी धरणात सोडण्याच्या प्रश्नावर शिवसेनेच्या पुढाकाराने बोलविण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीकडे भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरविली. सत्ताधारी सेना-भाजपा युतीच्या राज्यात भाजपाकडे जलसंपदा खात्याचा कारभार आणि त्यातही जिल्ह्याचे पालकमंत्रिपद जलसंपदा मंत्र्यांकडे असल्याने पाणीवाटपाच्या मुद्द्यावरून अन्य राजकीय पक्षांनी पाणी पेटविले असताना भाजपाची मात्र ठोस भूमिका घेण्यास अडचण झाली आहे. दरम्यान, सर्वपक्षीय बैठकीत मराठवाड्याला एकही थेंब पाणी न देण्याचा निर्धार करतानाच प्रसंगी न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेण्यात आला.
गोदावरी-मराठवाडा पाटबंधारे महामंडळाने गंगापूर धरणातून जायकवाडी धरणात १.३३ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर जिल्ह्यातील सर्व पक्षांनी मतभेद विसरून एकत्र येत विरोध दर्शविला आहे. पाणीवाटपाच्या मुद्द्यावर शिवसेनेचे महानगरप्रमुख व मनपातील गटनेते अजय बोरस्ते यांनी मंगळवारी सर्व पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीला कॉँग्रेस-राष्ट्रवादी, रिपाइंपासून ते आम आदमी पार्टीपर्यंतच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून पाणीवाटपाला विरोध दर्शविला असताना बैठकीकडे भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरविली. अजय बोरस्ते यांनी बैठकीसाठी भाजपाचे लक्ष्मण सावजी, संभाजी मोरुस्कर यांनाही निमंत्रित केले होते; परंतु त्यांनी त्यांच्या अनुपस्थितीबद्दल भाष्य करणे टाळले.
‘गंगापूर’ऐवजी ‘दारणा’तून पाणी सोडा
बैठकीत जलचिंतन संस्थेचे पदाधिकारी व अभियंता राजेंद्र जाधव यांनी पाणीसाठ्यासंबंधीची वस्तुस्थिती कथन केली. गंगापूर धरण समूहात सध्या ६ टीमसी पाणी शिल्लक आहे. त्यात महापालिकेकडून ४५०० दलघफू पाण्याचे आरक्षण करण्यात आले आहे. त्यातील ५०० दलघफू पाणी सिंहस्थासाठी राखीव ठेवण्यात आले होते. त्यातही पालिकेने कपात करत निम्मेच पाणी वापरले. शहरातही पाणीकपात सुरू करण्यात आली आहे. अशा स्थितीत जुलै २०१६ पर्यंत पाऊस न पडल्यास शहरावर गंभीर पाणीसंकट उद्भवू शकते. त्यामुळे गंगापूर धरणातील ५१० दलघफू पाणीसाठा पिण्यासाठी राखूनच ठेवला पाहिजे. गंगापूर धरणाऐवजी दारणा धरणातून पाणी सोडता येऊ शकेल.