महापालिकेत भाजपचेच बंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 11:10 PM2020-06-23T23:10:50+5:302020-06-23T23:11:59+5:30
नाशिक : पाच वर्षांपूर्वी झालेल्या कुंभमेळ्यातील पाणीपुरवठा व अन्य कामांच्या सुमारे १७ कोटी रुपयांची बिले देण्याच्या प्रस्तावाला महापौर सतीश कुलकर्णी यांनी मंजुरी दिली खरी; परंतु त्यातून भाजपअंतर्गत वाद पेटला आहे. महापौरांच्या निर्णयाला भाजपतील काही नगरसेवकांनी आव्हान दिले आहे. भाजपच्या २२ नगरसेवकांनी नगरसचिवांना पत्र दिले आहे. त्यामुळे भाजपतील अंतर्गत खदखद बाहेर आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

महापौर सतीश कुलकर्णी यांनी गेल्या १८ जून रोजी आॅनलाइन महासभा घेतली. यावेळी सिंहस्थातील ज्या कामांना मंजूर खर्चापेक्षा अधिक टक्केकिंवा त्यापेक्षा अधिक खर्च झाला आहे अशी देयके अदा करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. गेल्या पाच महासभांमध्ये हा विषय तहकूब होता. सिंहस्थ संपल्यानंतर आता पाच वर्षे झाल्यानंतर इतक्या विलंबाने हा विषय प्रशासनाने का मांडला, ज्यावेळी खर्च वाढला त्याचवेळी वाढीव खर्चास मंजुरी का घेण्यात आली नाही असे अनेक प्रश्न नगरसेवकांनी उपस्थित केला होता. भाजपचे संभाजी मोरुस्कर यांनी, तर पक्ष नगरसेवकांच्या बैठकीत हा विषय नामंजूर करण्याचे ठरल्याने त्यानुसारच हा प्रस्ताव फेटाळण्याची मागणी केली होती. मात्र, त्यानंतरदेखील महापौरांनी हा प्रस्ताव मंजूर केला, तर संबंधित प्रस्ताव रखडल्याने १६ जलकुंभाची कामे रखडल्याने हा प्रस्ताव मंजूर करावा लागला, असे कारण नंतर महापौरांनी दिले होते.
आता यासंदर्भात माजी गटनेते संभाजी मोरुस्कर, ज्येष्ठ नगरसेवक दिनकर आढाव, विशाल संगमनेरे, अजिंक्य साने, सुमन सातभाई, पुष्पा आव्हाड यांच्यसह २२ नगरसेवकांनी नगरसचिवांना पत्र दिले असून, हा प्रस्ताव मंजूर करण्यास विरोध असल्याचे नमूद केले आहे.शिवसेनेतही मतभेद, पण...गेल्या १८ जून रोजी झालेल्या महासभेत भाजपप्रमाणेच शिवसेनेतील मतभेददेखील उघड झाले होते. सिंहस्थाच्या याच कामास नामंजूर करण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी केली तर आपल्या प्रभागातील पाणीप्रश्न असल्याने हा प्रस्ताव मंजूर करण्याची मागणी शिवसेनेचेच सुधाकर बडगुजर यांनी केली होती. विशेष म्हणजे नंतर त्यांनी आपला या विषयाबाबत संभ्रम होता. कारण महासभा पूर्व पक्ष नगरसेवकांची बैठकच होत नसल्याचा दावा त्यांनी केला होता, तर बोरस्ते यांनी पत्रकारांशी बोलताना त्याचे खंडन केले होते.