भूमिका गुलदस्त्यात ठेवण्याची भाजपाची खेळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 01:09 AM2018-05-08T01:09:30+5:302018-05-08T01:09:30+5:30
विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपाने युती घोषित केली नाही, परंतु कोणाबरोबर राहायचेही घोषित केलेले नाही. शिवसेना उमेदवाराबरोबर काही मतदार तर काही थेट विकास आघाडीचे परवेज कोकणी यांच्याबरोबर असून, त्यामुळेच सोयीने निर्णय घेण्यासाठीच भाजपा भूमिका स्पष्ट करीत नसल्याचे वृत्त आहे.
नाशिक : विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपाने युती घोषित केली नाही, परंतु कोणाबरोबर राहायचेही घोषित केलेले नाही. शिवसेना उमेदवाराबरोबर काही मतदार तर काही थेट विकास आघाडीचे परवेज कोकणी यांच्याबरोबर असून, त्यामुळेच सोयीने निर्णय घेण्यासाठीच भाजपा भूमिका स्पष्ट करीत नसल्याचे वृत्त आहे. विशेषत: सोमवारी (दि.७) भाजपा पदाधिकाऱ्यांबाबत परवेज कोकणी यांची बैठक झाल्याचे सांगण्यात येत असतानादेखील भाजपाचे शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांनी याबाबत हात झटकले आहेत.
विधान परिषदेसाठी शिवसेनेने राज्यातील सहापैकी तीन जागांवर संख्याबळानुसार उमेदवार देताना उर्वरित तीन मतदारसंघात काय करायचे याबाबत स्थानिक स्तरावर अधिकार दिल्याचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी (दि.६) नाशिकमध्ये सांगितले. परंतु भाजपाने मात्र ज्या ठिकाणी उमेदवार नाही त्याठिकाणी काय करायचे याबाबत अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाही. विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचे नरेंद्र दराडे अर्ज दाखल करत असताना त्यांच्या बरोबर भाजपाचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण वगळता भाजपाचे कोणीही पदाधिकारी उपस्थित नव्हते. पक्षाकडून आदेश नसल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्यास किंवा तत्पूर्वी दराडे यांनी बोलविलेल्या बैठकीस भाजपाच्या वतीने कोणीही उपस्थित नव्हते. त्यावेळीदेखील पक्षाकडून अधिकृतरीत्या सेनेच्या बैठकीस जाण्यास सांगण्यात आले नसल्याचे खुद्द बाळासाहेब सानप यांनीच सांगितले होते. दुसरीकडे पक्षात अलीकडेच आलेले जिल्हा बॅँकेचे संचालक परवेज कोकणी यांच्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून भाजपा सदस्यांच्या सह्या आहेत. त्यामुळे परवेज कोकणी हे भाजपा पुरस्कृत उमेदवार आहेत, काय हेदेखील स्पष्ट केले नसल्याने सामान्य मतदार सदस्यही सध्या संभ्रमात आहेत.