पारंपरिक गडावर भाजपाची सत्त्वपरीक्षा

By admin | Published: February 19, 2017 12:22 AM2017-02-19T00:22:21+5:302017-02-19T00:22:32+5:30

सेना-अपक्षांचे आव्हान : मतविभागणीवरच विजयाची समीकरणे

BJP's Satyadra test on the traditional fort | पारंपरिक गडावर भाजपाची सत्त्वपरीक्षा

पारंपरिक गडावर भाजपाची सत्त्वपरीक्षा

Next

नाशिक : भाजपाचा पारंपरिक गड मानल्या जाणाऱ्या पंचवटी विभागात यंदा भाजपापुढे शिवसेनेसह अपक्षांनीही आव्हान उभे केले आहे. भाजपा शहराध्यक्ष व आमदार बाळासाहेब सानप आपल्या मतदारसंघात पक्षाची कामगिरी उंचावण्यासाठी मेहनत घेत असले तरी सानप यांच्या विरोधात सक्रिय झालेला गटही शह देण्यासाठी कार्यरत आहे. त्यामुळे विभागात गड कायम राखण्यासाठी आमदारांसह पदाधिकाऱ्यांचा कस लागणार आहे. विद्यमान १३ आणि माजी १० नगरसेवक पुन्हा नशीब आजमावत असले तरी मतविभागणीचा नेमका लाभ कुणाला होतो, यावरही विजयाची समीकरणे बदलू शकतात.  पंचवटी विभागात एक ते सहा प्रभाग आहेत. मागील निवडणुकीत विभागात २४ पैकी भाजपा ७, मनसे ७, शिवसेना १, राष्ट्रवादी ५, कॉँग्रेस २ आणि अपक्ष २ असे पक्षीय बलाबल होते. गतवेळी सेना-भाजपा स्वतंत्र लढले होते. यंदाही दोन्ही पक्षांनी स्वतंत्र चूल मांडलेली आहे. पंचवटी विभाग हा भाजपाचा गड राहिलेला आहे.  मात्र, यंदा शिवसेनेसह मनसे, अपक्ष यांनीही भाजपापुढे तगडे आव्हान उभे केले आहे. प्रभाग एकमध्ये भाजपा नगरसेवक रंजना भानसी विरुद्ध नगरसेवक गणेश चव्हाण यांच्या पत्नी सेनेच्या जयश्री पवार यांच्यात रंगतदार लढत होत आहे. रंजना भानसी या भाजपाकडून महापौरपदाच्या दावेदार मानल्या जातात. माजी नगरसेवक अरुण पवार यांनाही सेना-मनसेने आव्हान दिले आहे. प्रभाग २ मध्ये कॉँग्रेसचे उद्धव निमसे आणि शेकापचे माजी नगरसेवक जे. टी. शिंदे यांच्यात चुरशीची लढत होत आहे. मनसेचे माजी नगरसेवक अनंत सूर्यवंशी यांनीही आव्हान उभे केले आहे. प्रभाग ३ मध्ये आमदारपुत्र मच्छिंद्र सानप यांच्या उमेदवारीने लढत लक्षवेधी ठरली आहे. आमदार सानप यांच्यासाठी ही लढत प्रतिष्ठेची बनली आहे. पक्षांतर्गत विरोधकांनीही सानप यांची डोकेदुखी वाढविली आहे.  याच प्रभागात नगरसेवक ज्योती गांगुर्डे व रुची कुंभारकर यांच्यासाठी अस्तित्वाची लढत आहे. प्रभाग ४ मध्ये विरोधी पक्षनेत्या कविता कर्डक विरुद्ध अपक्ष रुक्मिणी कर्डक यांच्यात चुरशीचा सामना होईल. याच प्रभागात शिवसेना पुरस्कृत माजी नगरसेवक भगवान भोगे यांच्यासाठीही लढत सोपी नाही. त्यांच्यापुढे भाजपाचे आव्हान आहे. प्रभाग ५ मध्ये सेनेचे मनोज अदयप्रभू, भाजपाचे कमलेश बोडके व मनसेचे उल्हास धनवटे असा तिरंगी सामना रंगणार आहे. याच प्रभागात उपमहापौर गुरुमित बग्गा यांच्यासह मूळ कॉँग्रेसच्या पण अपक्ष लढणाऱ्या विमल पाटील, उल्हास धनवटे यांनी पक्षविरहित पॅनल केल्याने त्यांचेही आव्हान सेना-भाजपापुढे आहे. माजी खासदारपुत्र संजय पाटील यांच्या लढतीनेही प्रभाग लक्षवेधी ठरला आहे. प्रभाग ६ मध्ये विद्ममान महापौर अशोक मुर्तडक यांच्यासमोर भाजपाकडून नगरसेवक दामोदर मानकर यांचे आव्हान आहे. या प्रभागात भाजपाकडून सुनील बागुल यांच्या मातोश्री भिकुबाई बागुल यांच्या उमेदवारीनेही रंगत आणली आहे.

Web Title: BJP's Satyadra test on the traditional fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.