नाशकात घरपट्टी दरवाढ सौम्य करण्याचे भाजपाचे संकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 08:22 PM2018-02-27T20:22:12+5:302018-02-27T20:22:12+5:30
महापौरांकडून दिलासा : व्यापारी-उद्योजक संघटनांचे साकडे
नाशिक : सर्वत्र निर्माण झालेला रोष आणि विरोधी पक्षांनी सुरू केलेली आंदोलने यामुळे सत्ताधारी भाजपा अडचणीत येऊ पाहत असतानाच महापालिकेने घरपट्टीत केलेली दरवाढ सौम्य करण्याचे आश्वासन महापौर रंजना भानसी यांनी मंगळवारी (दि.२७) व्यापारी-उद्योजक संघटनांच्या शिष्टमंडळाला दिले आहे. महासभेत करवाढीचा निर्णय झाला असला तरी, तीनही आमदार आणि पालकमंत्र्यांशी चर्चा करून सर्वांना परवडेल अशीच दरवाढ केली जाईल, असेही महापौरांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे दरवाढ निम्म्यावर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महापालिकेने घरपट्टी दरात ३३ ते ८२ टक्के वाढ केल्याने विरोधी पक्षांकडून आंदोलने सुरू आहेत तर भाजपा वगळता सर्व विरोधी पक्षांनी एकत्रित येऊन त्याविरोधात लढा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, सोमवारी (दि.२६) चेंबर आॅफ कॉमर्सच्या कार्यालयात व्यापारी व उद्योग संघटनांच्या पदाधिका-यांची बैठक होऊन त्यात महापौरांना भेटून निवेदन देण्याचे ठरविण्यात आले होते. त्यानुसार, मंगळवारी (दि.२७) महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांच्या नेतृत्वाखाली उद्योग, व्यापारी संघटनांचे पदाधिकारी तसेच राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन महापौर रंजना भानसी यांना निवेदन दिले. यावेळी संतोष मंडलेचा यांनी सांगितले, दरवाढीला आमचा विरोध नसून ती अवाढव्य न करता माफक प्रमाणात करावी. नाशिकमध्ये अनेक कारखाने आजारी आहेत. मंदीच्या लाटेतून सावरले जात असतानाच ही कंबरतोड करवाढ अन्यायकारक आहे. मनपाने एकाच वर्षी एवढी वाढ न करता ती टप्प्याटप्प्याने वाढवावी, अशी सूचनाही मंडलेचा यांनी केली. रिटेल क्लॉथ मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष दिग्विजय कापडिया,निमाचे अध्यक्ष मंगेश पाटणकर, सीटूचे नेते डॉ. डी. एल. कराड यांनीही करवाढ अन्यायकारक असल्याचे स्पष्ट केले.
सर्वांना परवडेल अशीच दरवाढ
शिष्टमंडळाने आपले म्हणणे मांडल्यानंतर महापौर रंजना भानसी यांनी सांगितले, महासभेत करवाढीचा प्रस्ताव आला असला तरी त्याचवेळी एक समिती नेमून त्यावर निर्णय घेण्याची माझी भूमिका होती. परंतु, करवाढीचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी अखेरचा दिवस असल्याने निर्णय घेणे भाग पडले. मात्र, प्रस्ताव काहीही असला तरी सर्वांना परवडेल अशीच दरवाढ केली जाईल. त्यासंदर्भात पक्षाचे तीनही आमदार व पालकमंत्री यांचेशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. मी जनतेची प्रतिनिधी असल्याने जनतेसोबतच असल्याचेही महापौरांनी स्पष्ट केले.