भाजपाची द्वारका येथे घोषणाबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:25 AM2021-02-06T04:25:04+5:302021-02-06T04:25:04+5:30
नाशिक : ‘आघाडी शासन करतंय काय, खाली डोके वर पाय, अन्यायकारक वीज बिले मागे घ्या, वीज कनेक्शन तोडण्याची भाषा ...
नाशिक : ‘आघाडी शासन करतंय काय, खाली डोके वर पाय, अन्यायकारक वीज बिले मागे घ्या, वीज कनेक्शन तोडण्याची भाषा करणाऱ्या ठाकरे सरकारचा जाहीर धिक्कार असो’ अशा घोषणा देत द्वारकाच्या विद्युत मंडळाच्या कार्यालयासमोर भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी निदर्शने करून आंदोलन केले. गेटसमोर आंदोलने केल्यानंतर द्वारका कार्यालयातील वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांना निवेदनदेखील देण्यात आले.
राज्यभरातील नागरिकांना चुकीची वीज बिले पाठवून आता त्यांचे कनेक्शन तोडण्याचा नोटीसद्वारे इशारा देणाऱ्या वीज महामंडळाचा आणि महाआघाडी सरकारचा निषेध करून ही बिलवाढ त्वरित मागे घेण्याची मागणीदेखील आंदोलनाद्वारे करण्यात आली. भाजपाच्यावतीने शहरात विविध ठिकाणी करण्यात आलेल्या आंदोलनांप्रमाणे येथेदेखील राज्य शासनाच्या विरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली. यापूर्वी देण्यात आलेल्या अवाजवी बिलांमध्ये दुरुस्ती करण्यात यावी, वीज बिलमाफीच्या आश्वासनाचे झाले काय, खाली डोके वरती पाय, अशा घोषणादेखील यावेळी देण्यात आल्या. वीज मंडळाने दिलेले चुकीचे बिल भरले नाही म्हणून वीज पुरवठा खंडित करायला निघालेले हे सरकार अत्यंत असंवेदनशील असून, महाविकास आघाडी सरकारला मनमानी करू देणार नसल्याचा इशारादेखील निवेदनाद्वारे देण्यात आला. द्वारकाच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यांना यावेळी निवेदन देण्यात आले. यावेळी भाजपाचे पदाधिकारी विजय साने, सतीश सोनवणे, चंद्रकांत खोडे, यशवंत निकुळे, सुमन भालेराव, अर्चना थोरात, रुपाली निकुळे, शाहीन मिर्झा यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो (०५ व्दारका आंदोलन)
वीज मंडळाच्या द्वारका कार्यालयासमोर केलेल्या आंदोलनानंतर निवेदन देताना विजय साने, सतीश सोनवणे, चंद्रकांत खोडे, सुमन भालेराव, अर्चना थोरात, रुपाली निकुळे, शाहीन मिर्झा आणि अन्य पदाधिकारी.