शिक्षण समिती सभापतीपदी भाजपाच्या सोनवणे; गटबाजीचा लाभ उठविण्याचा शिवसेनेचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 04:25 PM2018-12-29T16:25:21+5:302018-12-29T16:28:18+5:30
शिक्षण समितीवर भाजपाचे पाच, सेनेचे तीन व एक कॉँग्रेसचा सदस्य असल्याने साहजिकच भाजपाचा वरचष्मा असला तरी, सेनेने ही निवडणूक बिनविरोध होऊ नये म्हणून सुदाम डेमसे यांना सभापतिपदाची उमेदवारी दिली होती.
नाशिक : नाशिक महापालिकेच्या शिक्षण समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या प्रा. सरिता सोनवणे यांची निवड करण्यात आली. बहुमत भाजपाच्या बाजूने असूनही या निवडणुकीत शिवसेनेनेही उमेदवार उभा करून भाजपांतर्गत गटबाजीचा लाभ उचलण्याचा केलेला प्रयत्न फसून सभापती, उपसभापतिपदी सेनेचे उमेदवार पराभूत झाले. उपसभापतिपदी भाजपाच्याच प्रतिभा पवार यांची निवड करण्यात आली.
शिक्षण समितीवर भाजपाचे पाच, सेनेचे तीन व एक कॉँग्रेसचा सदस्य असल्याने साहजिकच भाजपाचा वरचष्मा असला तरी, सेनेने ही निवडणूक बिनविरोध होऊ नये म्हणून सुदाम डेमसे यांना सभापतिपदाची उमेदवारी दिली होती. तर भाजपाकडून सभापतिपदासाठी सरिता सोनवणे व उपसभापतिपदासाठी प्रतिभा पवार या दोघांनी उमेदवारी देऊन त्यांचे नामांकनही दाखल केले होते. परंतु सेनेने या निवडणुकीत चमत्कार करण्याच्या दृष्टीने दोन्ही जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले. सभापती व उपसभापतिपदाच्या निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम राधाकृष्णन् यांच्या अध्यक्षतेखाली समिती सदस्यांची विशेष बैठक घेण्यात आली. त्यात उमेदवारी अर्जाची छाननी, माघारीसाठी वेळ देण्यात आला व प्रत्यक्ष निवडणुकीला सुरुवात करण्यात आल्यावर सभापतिपदासाठी सरिता सोनवणे यांच्या बाजूने भाजपाच्या पाचही सदस्यांनी हात वर केले. तर सेनेचे सुदाम डेमसे यांना तीनच मते मिळाली. त्यामुळे सोनवणे यांच्या निवडीची घोषणा जिल्हाधिकाऱ्यांनी केली. त्यानंतर उपसभापतिपदासाठी निवडणूक घेण्यात आली. त्यात भाजपाच्या प्रतिभा पवार यांच्या बाजूने पाच तर सेनेचे संतोष गायकवाड यांच्या बाजूने चार मते मिळाली. कॉँग्रेसचे राहुल दिवे यांनी सेनेच्या बाजूने मतदान केले. दरम्यान या निवडीनंतर भाजपाच्या सदस्यांनी जल्लोष केला. नवनिर्वाचित सभापती, उपसभापतींचा महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायी सभापती हिमगौरी आडके, संभाजी मोरूस्कर, जगदीश पाटील, राहुल दिवे आदी उपस्थित होते.