स्थायी सभापतिपदासाठी भाजपाचा हट्ट; तोडगा नाही
By admin | Published: June 19, 2014 12:19 AM2014-06-19T00:19:00+5:302014-06-19T00:56:27+5:30
नाशिक : महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदासाठी भाजपाने दावा केला असून, गेल्यावर्षी मनसेने दिलेला शब्द पाळण्यासाठी दबावतंत्राचा वापर सुरू केला आहे.
नाशिक : महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदासाठी भाजपाने दावा केला असून, गेल्यावर्षी मनसेने दिलेला शब्द पाळण्यासाठी दबावतंत्राचा वापर सुरू केला आहे. त्यामुळे मंगळवारी झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. आता हा विषय पक्षनेत्यांकडे सोपविण्यात आला आहे.
महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदाची निवडणूक लवकरच होणार आहे. त्यासाठी व्यूहरचना सुरू झाली आहे. मनसे आणि भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची मंगळवारी ‘रामायण’वर बैठक झाली. या बैठकीत भाजपाने सभापतिपदावर दावा सांगितला.
गेल्या दोन वर्षांत मनसेला सभापतिपदासाठी भाजपाने संधी दिली होती. गेल्यावर्षी झालेल्या चर्चेनुसार आता भाजपाला ही संधी मिळणे अटळ आहे, असे या पक्षाच्या वतीने सांगण्यात आले. तर, मनसेला पालिकेत सत्ता असूनही अनेक कामे करता आली नाहीत. स्थायी समिती असल्यावरच ती
होणे शक्य असल्याने यंदा मनसेला संधी द्यावी आणि त्यानंतर पुढील वर्षी भाजपाने सभापतिपद घ्यावे, असे मत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मांडले.
गेल्यावर्षी सभापतिपदाच्या निवडणुकीच्या वेळी मुंबईत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे तसेच गिरीश महाजन यांच्यासह अन्य नेत्यांच्या झालेल्या बैठकीत पुढील वर्षी म्हणजेच आत्ता २०१४ मध्ये भाजपाला उमेदवारी देण्याचे ठरले असल्याचे स्मरण भाजपाने करून दिले. भाजपा जुमानत नसल्याने अखेरीस बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही. दोन दिवसांनी पुन्हा चर्चा करण्याचे ठरविण्यात आले. मनसेचे शहर संपर्क अध्यक्ष अविनाश अभ्यंकर यांनी राज
ठाकरे यांच्याशी चर्चा करून
निर्णय घेऊ, असे सांगितले.
बैठकीस आमदार वसंत गिते,
महापौर अॅड. यतिन वाघ, मनसेचे सभागृह नेता शशिकांत जाधव, शहराध्यक्ष राहुल ढिकले, भाजपाच्या वतीने शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, माजी अध्यक्ष विजय साने, माजी महापौर बाळासाहेब सानप, गटनेता संभाजी मोरूस्कर आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)