विरोधकांना शह देण्यासाठी भाजपाची रणनीती
By Admin | Published: March 25, 2017 12:59 AM2017-03-25T00:59:33+5:302017-03-25T00:59:57+5:30
नाशिक : अपक्ष व रिपाइंच्या सदस्यांची मोट बांधत विरोधकांनी स्थायी समिती ताब्यात घेण्याची व्यूहरचना आखल्याने भाजपाने आता विरोधकांना शह देण्यासाठी रणनीती आखल्याची चर्चा आहे.
नाशिक : अपक्ष व रिपाइंच्या सदस्यांची मोट बांधत भाजपा विरोधकांनी स्थायी समिती ताब्यात घेण्याची व्यूहरचना आखल्याने पायाखालची वाळू घसरलेल्या भाजपाने आता विरोधकांना शह देण्यासाठी रणनीती आखल्याची चर्चा आहे. सेनेसोबत रिपाइंची आघाडी होऊ नये, यासाठी भाजपाकडून शासन स्तरावरून विभागीय आयुक्तांवर दबाव टाकला जात असल्याची चर्चा असून, येत्या ३० मार्चला सदस्य नियुक्तीसाठी विशेष महासभा बोलविण्याचे नियोजन सुरू असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. भाजपाने महापालिकेत स्पष्ट बहुमत संपादन केले असले तरी अर्थकारणाशी संबंधित अत्यंत महत्त्वाची स्थायी समिती ताब्यात घेण्यासाठी विरोधकांनी चाल खेळली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मनसे, कॉँग्रेस व राष्ट्रवादीने प्रत्येकी एक अपक्ष आपल्या सोबत घेत एकत्रित गटनोंदणी केलेली आहे तर शिवसेनेने एकमेव निवडून आलेल्या रिपाइंसोबत आघाडी करण्यासाठी नोंदणी अर्ज विभागीय आयुक्तांकडे दिला आहे. सेना, कॉँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, अपक्ष व रिपाइं असे सारे विरोधक एकत्र आल्यास तौलनिक संख्याबळानुसार स्थायी समितीवर भाजपाचे ८, सेनेचे ५, कॉँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेचे प्रत्येकी एक सदस्य जाऊ शकतील. त्यामुळे स्थायीवर समसमान बलाबल होऊन चिठ्ठी पद्धतीने सभापतिपदाची वर्णी लागू शकेल. विरोधकांनी भाजपाला धोबीपछाड देण्यासाठी ही चाल खेळली असतानाच सत्ता मिळूनही स्थायी हातातून जाण्याच्या भीतीने भाजपाची आता विरोधकांना शह देण्यासाठी भागम्भाग सुरू झाली आहे. भाजपातील थिंक टॅँकर्स जुने संदर्भ काढून कायद्याचा कीस काढण्यात व्यस्त आहेत. त्यातच शिवसेनेची रिपाइंसोबत आघाडी नोंदविली जाऊ नये यासाठी शासनस्तरावरून विभागीय आयुक्तांवरही दबाव आणण्याच्या हालचाली सुरु असल्याची चर्चा आहे. शिवसेनेने शुक्रवारी विभागीय आयुक्तांकडे नोंदणीबाबत विचारणा केली असता त्यांना प्रतिसाद दिला नसल्याचे वृत्त आहे. (प्रतिनिधी)