भाजपाच्या चक्का जाममुळे महामार्गावर कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:11 AM2021-06-27T04:11:45+5:302021-06-27T04:11:45+5:30
ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याचा मुद्दा सध्या गाजत आहे. जोपर्यंत ओबींसीच्या आरक्षणाचा मुद्दा निकाली निघत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य ...
ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याचा मुद्दा सध्या गाजत आहे. जोपर्यंत ओबींसीच्या आरक्षणाचा मुद्दा निकाली निघत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका पोटनिवडणुका घेऊ देणार नाही असा इशाराही राजकीय पक्षांनी दिला आहे. भाजपाने या विषयावर शनिवारी (दि.२६) राज्यभर चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार मुंबई-आग्रा महामार्गावर मुंबई येथे आंदोलन करण्यात आले. महामार्ग रोखून भाजपने जोपर्यंत ओबीसींना आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत भाजप स्वस्थ बसू देणार नाही असा इशारा दिला आहे.
विल्होळी येथे पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले, महापौर सतीश कुलकर्णी शहराध्यक्ष गिरीश पालवे, प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब सानप, प्रवक्ते लक्ष्मण सावजी, विजय साने यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. मुंबई-आग्रा महामार्गावर यावेळी राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. विविध मागण्यांचे फालक घेऊन आंदेालन करण्यात आले. या आंदोलनामुळे दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अखेरीस पोलिसांनी कार्यकर्त्यांना अटक करून पुन्हा सुटका केल्यानंतर आंदोलन संपले आणि वाहतूक सुरळीत झाली.
या आंदेालनात सभागृह नेते कमलेश बोडके, महिला अध्यक्ष हिमगौरी आडके, नगरसेवक प्रशांत जाधव, जगन पाटील, सुनील केदार, उत्तम उगले, अलका जांभेकर, चंद्रकांत थोरात, सतीश रत्नपारखी, प्रणव शिंदे, राजेंद्र महाले, राजेश दराडे, गणेश कांबळे, प्रा. शरद मोरे, देवदत्त जोशी, भास्करराव घोडेकर, ॲड. अजिंक्य साने आदीसह लोकप्रतिनिधी, पदाधिकारी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.