भाजपचे दोन बाद, सेनेला एकावर समाधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:41 AM2020-12-11T04:41:01+5:302020-12-11T04:41:01+5:30
या चारही विषय समित्यांच्या सभापतीपदाच्या निवडणुका जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि. १०) महिला व बालकल्याण समिती, शहर ...
या चारही विषय समित्यांच्या सभापतीपदाच्या निवडणुका जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि. १०) महिला व बालकल्याण समिती, शहर सुधार, आरोग्य वैद्यकीय साहाय्य, विधी समिती या चार समित्यांच्या निवडणुका पार पडल्या. शहर सुधारणा समिती वगळता अन्य तिन्ही समित्यांच्या सभापती-उपसभापतीपदासाठी एकमेव भाजपचे अर्ज दाखल होते. केवळ शहर सुधारणा समितीच्या सभापती आणि उपसभापतीपदासाठी शिवसेनेचे सुदाम डेमसे यांनी अर्ज दाखल केला होता. त्यातही ते माघार घेतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. गुरुवारी (दि. १०) जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया सुरू केली. यात भाजपच्या उमेदवार छाया देवांग यांच्या सूचक असलेल्या इंदुबाई नागरे यांची अर्जावरील आणि मनपाच्या अभिलेखातील स्वाक्षरी जुळली नाही. त्याचप्रमाणे डेमसे यांच्या सूचक असलेल्या राधा बेंडकोळी यांच्याबाबतीत देखील असाच प्रकार घडला. दोन्ही उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने मांढरे यांना निवडणूक स्थगित करावी लागली. या समितीच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजपच्या अलका अहिरे आणि शिवसेनेच्या सुदाम डेमसे यांचे अर्ज दाखल होते. यावेळी अहिरे यांच्या अनुमोदक सुमन भालेराव यांनी अर्जवर केवळ सुमन भालेराव अशी स्वाक्षरी केली, तर मनपाच्या अभिलेखात ‘सुमन मधुकर भालेराव’ अशी स्वाक्षरी केल्याचे आढळल्याने अलका अहिरेंचा अर्ज बाद झाला. मात्र, सेनेचे सुदाम डेमसे यांचा अर्ज सुदैवाने वैध ठरल्याने अखेरीस त्यांची उपसभापतीपदी निवड झाल्याचे पीठासन अधिकारी मांढरे यांनी घोषित केले.
इन्फो..
आराेग्य समितीत हिट विकेट...
वैद्यकीय आरोग्य साहाय्य समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत देखील भाजपच्या उमेदवार पुष्पा आव्हाड यांचा उमेदवारी अर्ज देखील बाद ठरला. त्यांनी उमेदवारी अर्जावर इंग्रजीत सही केली होती. मात्र, अभिलेखात मराठी सही होती. दुसरीकडे त्यांचे पॅनकार्ड मागवले असता, त्यावर देखील मराठीच स्वाक्षरी होती. त्यामुळे त्यांचा अर्ज बाद करण्यात आला.
..इन्फो..
* बहुमत असतानाही सभापतीपद हातचे गेल्याने छाया देवांग यांना भरून आले. मात्र, त्यांची सभागृह नेते सतीश सोनवणे आणि गटनेता जगदीश पाटील यांनी समजूत काढली.
* शहर सुधार समितीच्या निवडणुकीच्या वेळी विजयाच्या अपेक्षेने आलेले महापौर सतीश कुलकर्णी यांची घोर निराशा झाली. छाया देवांग यांचा अर्ज नाकारल्याने त्यांची अडचण झाली. त्यामुळे उपसभापतीपदाच्या निवडणुकीत विजयी झालेले शिवसेनेच्या सुदाम डेमसे यांना पुष्पगुच्छ देऊन ते माघारी परतले.