सानप यांच्या घरवापसीच्या प्रयत्नाने भाजपतच अस्वस्थता!

By किरण अग्रवाल | Published: November 22, 2020 02:11 AM2020-11-22T02:11:33+5:302020-11-22T02:12:42+5:30

पक्ष असो की व्यक्ती, राजकारणात परस्परांची गरज बघून तडजोडी केल्या जातात. पक्षांतरे असोत, की घरवापसी; त्यामागेही अशीच गणिते असतात. उभयतांची ती गरज असते. त्यामुळे माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या भाजपत होऊ घातलेल्या पुनर्प्रवेशाच्या प्रयत्नांकडे त्याच दृष्टीने बघता यावे; पण या आगमनामुळे इतरांमध्ये अस्वस्थता निर्माण होणे स्वाभाविक आहे, कारण त्यामुळे काही समीकरणे व वर्चस्ववादाचे गणित बदलण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या आगामी निवडणुकीची पार्श्वभूमी त्यामागे आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांची याबाबत मत आजमावणी करण्याची वेळ त्यामुळेच आल्याचे म्हणता यावे.

BJP's uneasiness over Sanap's attempt to return home! | सानप यांच्या घरवापसीच्या प्रयत्नाने भाजपतच अस्वस्थता!

सानप यांच्या घरवापसीच्या प्रयत्नाने भाजपतच अस्वस्थता!

Next
ठळक मुद्देनाशिक महापालिका निवडणुकीच्या तयारीची नांदी...

सारांश


विशिष्ट भूमिकेतून अगर विचारधारेतून राजकीय पक्षांतरे घडून येण्याचे दिवस कधीचेच सरलेत, आता पक्षांतरे होतात ती संधीसाठी; त्यामुळे संधी मिळाली नाही किंवा ती मिळूनही तिचे सोने करता आले नाही की घरवापसीची प्रक्रिया सुरू होणे स्वाभाविक ठरते. नाशकातील माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या सद्य:स्थितीतील हालचालींकडे त्याचदृष्टीने बघता यावे. अवघ्या वर्ष-सव्वा वर्षावर येऊन ठेपलेल्या महापालिका निवडणुकीची पार्श्वभूमी या हालचालींमागे असल्यास नवल ठरू नये.


कोरोनाच्या संकटामुळे गेली काही महिने राजकीय आघाडीवर स्वस्थताच आलेली होती. अलीकडच्या दीड-दोन महिन्यांत ती काहीशी दूर होऊ पाहात असताना दिवाळी आली, त्यामुळे राजकीय फटाके या दिवाळीनंतर फुटण्याचे अंदाज याच स्तंभात वर्तविण्यात आलेले होते. नेमके तेच सुरू झाले आहे. खरे तर दिवाळी अजून संपलेली नाही व या दिवाळीतील फटाकेही सादळलेले नाहीत; पण त्यापूर्वीच राजकीय फटाके फुटू लागले आहेत. राजकारण किती घाईचे झाले आहे किंवा फार काळ कोणी, कुठे प्रतीक्षेवर राहू इच्छित नाही हेच यावरून लक्षात यावे.


नाशकातील भाजपचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांना गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाने तिकीट नाकारल्यानंतर ते राष्ट्रवादीचे उमेदवार बनले होते; पण उमेदवारीची संधी मिळूनही त्यांना पराभव बघावा लागला त्यामुळे ते राष्ट्रवादीचा उंबरा सोडून शिवसेनेत दाखल झाले. त्यांच्या येण्याची उपयोगिता सिद्ध न होऊ शकल्याने शिवसेनेतही ते अडगळीतच होते; परिणामी आता त्यांना पुनश्च भाजपत परतण्याचे म्हणजे घरवापसीचे वेध लागले आहेत म्हणे. अर्थात ऐन निवडणुकीच्या काळात अशी उपयोगिता न पाहता भरती करून घेण्याची प्रथा सर्वच पक्षात असली तरी सवडीच्या काळात मात्र कुणाकडेही ते सहज होत नसते. म्हणूनच सानप यांच्या पक्षप्रवेशाबाबत मत आजमावणीकरिता सरचिटणीस नाशकात आले. 


भाजपत असताना व आमदारकीच्या काळात प्रारंभीच्या दिवसात गिरीश महाजन यांची मर्जी संपादन करून असल्यामुळे सानप यांचा स्थानिक पातळीवर पक्षात व महापालिकेतही दबदबा होता. मला नाही तर अन्य कुणासही नाही, असा त्यांचा हेका राहिल्याने भाजपच्या सत्ताकाळात नाशिकच्या वाट्याला मंत्रिपद लाभू शकले नव्हते. सानप पक्षाचे शहराध्यक्ष असताना महापालिकेत प्रथमच स्वबळावर या पक्षाची सत्ता आली, त्यामुळे ओघाने तेथेही त्यांचीच चलती होती; पण महाजनांचे बोट सुटले आणि तेथूनच परिस्थिती बदलली.


मुळात आपल्याच पक्षाच्या एका माजी आमदार व शहराध्यक्ष राहिलेल्यास पुन्हा पक्षात घेण्यासाठी अशी मत आजमावणी करावी लागत असेल तर त्यातून त्या व्यक्तीची उपयोगिता व उपद्रवमूल्यही उघड व्हावे. तसेही स्थानिक पातळीवर या पक्षाचे निर्नायकत्व वेळोवेळी उघड होऊन गेलेले असल्याने महापालिका लढायला व त्याची तयारी करायला सक्षम नेतृत्वाची उणीव भासत असेल तर काय सांगावे? त्यांना तिकडे कुणी पुसत नाही व इकडे यांचे गाडे कुणी हाकत नाही, त्यामुळे हा परस्पर गरजेचा मामला असावा. सानप यांच्या घरवापसीच्या चर्चेनेच केवळ फटाके फुटत आहेत व भाजपतच अस्वस्थता दिसत आहे ती त्यामुळेच.


सुरुवात तर झाली, आता कुणाचा नंबर?
नाशिक महापालिकेची निवडणूक वर्षभरावर येऊन ठेपली आहे, त्यादृष्टीने दिवाळी होत नाही तोच बाळासाहेब सानप यांच्या घरवापसीची चर्चा सुरू झाली आहे. ते शिवसेनेत जाऊन अस्वस्थ होते, तसे भाजपत काहीजण येऊन अस्वस्थ आहेत. सत्ता आपलीच येणार, या भ्रमात राहून दिली गेलेली आश्वासने नंतरच्या काळात पूर्ण न झाल्याने ही अस्वस्थता संबंधितांच्या वाट्यास आली आहे, त्यामुळे येत्या काही दिवसांत पुन्हा नवीन फटाके फुटण्याची शक्यता नाकारता येऊ नये. शिवाय, भाजपप्रमाणेच अन्य पक्षांतही काही हालचाली होऊ घातल्या आहेत. 

Web Title: BJP's uneasiness over Sanap's attempt to return home!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.