भाजपाच्या विजयी वारुला मालेगावात लगाम

By admin | Published: May 26, 2017 07:07 PM2017-05-26T19:07:46+5:302017-05-26T19:08:05+5:30

मालेगाव : देशभरातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये विजयी पताका फडकविणाऱ्या भाजपाच्या वारुला मालेगावकरांनी महापालिकेत लगाम लावला आहे.

BJP's victorious Varula bows in Malegaon | भाजपाच्या विजयी वारुला मालेगावात लगाम

भाजपाच्या विजयी वारुला मालेगावात लगाम

Next

मालेगाव/संजय दुनबळे
मालेगाव : देशभरातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये विजयी पताका फडकविणाऱ्या भाजपाच्या वारुला मालेगावकरांनी महापालिकेत लगाम लावला आहे. पक्षाची मुस्लीम कार्डची खेळी फसली असली तरी ९ जागा मिळवुन मालेगावात खाते उघडल्याचे समाधान मात्र पक्षधुरीनांना मिळाले आहे. शहराच्या पूर्व भागातुन भाजपाचा एकही मुस्लिम उमेदवार निवडून आला नसला तरी आपण मुस्लिमांनाही संधी दिल्याचे सांगण्यास पक्षनेते विसरले नाहीत.
त्रिशंकु स्थितीत सर्वाधिक २८ जागा मिळवुन कॉँग्रेसने आपले वर्चस्व कायम ठेवले असले तरी सत्ता स्थापनेसाठी लागणाऱ्या मॅजीक आकड्यासाठी मोठा सत्ता संघर्ष व तडजोडीचे राजकारण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मागील पंचवार्षीकमध्ये तीसरा महाज व कॉँग्रेसने आघाडी करुन अडीचवर्ष महापौरपदी कॉँग्रेसच्या ताहेरा शेख यांची वर्णी लावली होती. मात्र राजकीय घडामोडी घडल्यानंतर तिसरा महाज, सेना, शहर विकास आघाडीला हाताशी धरुन माजी आमदार मौलाना मुफ्ती मो. इस्माईल यांचे खंदे समर्थक हाजी मो. इब्राहीम यांना महापौरपदाची संधी देण्यात आली होती. या काळात विविध आरोप प्रत्यारोपामुळे महापालिकेच्या कारभाराचे वाभाडे निघाले असल्यामुळे यावेळच्या निवडणुकीकडे जाणकारांचे लक्ष लागले होते.
गतवेळच्या तिसरा महाजचे यावेळी राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये विलीनीकरण करण्यात आले. राष्ट्रवादी कॉँग्रेसने जनता दलाशी युती केली तर राष्ट्रीय कॉँग्रेसने स्वतंत्रपणे निवडणुक रिंगणात उडी घेतली. केंद्र आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपा आणि शिवसेना यांनी परस्परांविरुध्द दंड थोपटले तर एमआयएमने प्रथमच आपले भवितव्य आजमाविले. निवडणुकीत सुरुवातीपासूनच चुरस निर्माण झाली प्रचारादरम्यान परस्परांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या गेल्या. प्रत्येक पक्षाने विजयाचा दावा केला असला तरी मतदानाची कमी टक्केवारी सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकविणारी ठरली. रखरखीत उन्हामुळे मतदानाची टक्केवारी घसरली. त्यामुळे बहुमताच्या ४३ या जादुई संख्येपर्यत एकाही पक्षाला पोहोचता आले नसले तरी या निवडणुकीच्या निमित्ताने मालेगावात भारतीय जनता पक्षाने आणि एमआयएमने प्रत्येकी ९ आणि ७ जागा मिळवुन आपले खाते उघडले आहे.गतवेळी दोन नगरसेवक असलेल्या मनसेचा या निवडणुकीत सुपडा साफ झाला असून जनता दलाला ६ जागांच्या रुपाने काहीसा दिलासा मिळाला आहे.
महापालिकेचे महापौरपद सर्वसाधारण पुरुषासाठी राखीव असल्यामुळे सत्ता स्थापनेसाठी सर्वच पक्षांमध्ये रस्सीखेच होणार असली तरी कॉँग्रेसचे माजी आमदार शेख रशीद यांनी महापौर पदाचे उमेदवार म्हणूनच महापालिकेच्या निवडणुकीत उडी घेतली आहे. आपली महापौरपदाची इच्छा पुर्ण करण्यासाठी आता ते कोणती खेळी खेळतात यावरच पुढील गणिते अवलंबुन आहेत.
दादा भुसे यांच्या रुपाने शिवसेनेने मालेगावला मंत्रीमंडळात स्थान दिले असले तरी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये शिवसेनेचा झालेला पराभव दादा भुसे यांच्या जिव्हारी लागला होता. या पराभवाचा वचपा काढण्यासाठी त्यांनी महापालिकेची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मागील पंचवार्षीक मध्ये ११ जागांवर असलेली शिवसेना यावेळी १३ जागांवर पोहोचल्याने भुसे यांनी पराभवाचा वचपा काढला असे म्हणायला हरकत नाही.

Web Title: BJP's victorious Varula bows in Malegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.