महापालिका स्थायी समितीवर भाजपाची लढाऊ ब्रिगेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 03:25 PM2018-02-28T15:25:34+5:302018-02-28T15:25:34+5:30

भाजपाची रणनीती : प्रस्तावच येत नसल्याने संघर्ष अटळ

 BJP's warrior brigade on a standing committee | महापालिका स्थायी समितीवर भाजपाची लढाऊ ब्रिगेड

महापालिका स्थायी समितीवर भाजपाची लढाऊ ब्रिगेड

Next
ठळक मुद्देस्थायी समितीवरील आठ सदस्य नियमानुसार निवृत्त भाजपाने सभागृहनेता दिनकर पाटील, उद्धव निमसे, भाग्यश्री ढोमसे आणि पुष्पा आव्हाड यांना स्थायीवर पाठविले आहे

नाशिक - महापालिका आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारलेल्या तुकाराम मुंढे यांनी ‘त्रिसूत्री’चा अवलंब करत विविध कामांना ब्रेक लावत आपल्या आगामी कारभाराचे संकेत दिल्यानंतर महापालिकेची अर्थवाहिनी समजल्या जाणा-या स्थायी समितीची आक्रमकता वाढविण्यासाठी सत्ताधारी भाजपाने रणनीती आखली आहे. त्यानुसार, स्थायी समितीच्या रिक्त झालेल्या जागांवर लढाऊ ब्रिगेडला पुढे चाल देण्याचा निर्णय घेण्यात आला असून बुधवारी (दि.२८) महासभेत घोषित करण्यात आलेल्या सदस्यांच्या नियुक्तीत त्याचा प्रत्यय आला आहे.
महापालिकेच्या स्थायी समितीवरील आठ सदस्य नियमानुसार निवृत्त करण्यात आले. त्यात भाजपाचे ४, शिवसेनेचे २ आणि कॉँग्रेस व राष्टÑवादीच्या प्रत्येकी एका सदस्याचा समावेश होता. या रिक्त झालेल्या जागांवर नवीन सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी महापौर रंजना भानसी यांनी बुधवारी (दि.२८) विशेष महासभा बोलाविली होती. तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर ज्या पद्धतीने कामकाजाला सुरूवात केली आहे, त्याचा धसका सत्ताधारीसह विरोधीपक्षानेही घेतला आहे. कामांची आवश्यकता, तांत्रिक योग्यता व व्यवहार्यता या त्रिसूत्रीचा अवलंब करत त्यांनी आपल्या पहिल्याच महासभेत १५ कोटींच्या कामांचे प्रस्ताव मागे घेतले शिवाय, नगरसेवक निधीतील कामांसह २५७ कोटींच्या रस्ते विकास कामांनाही ब्रेक लावला. त्यामुळे, सत्ताधारी भाजपासह विरोधीपक्षातही अस्वस्थता आहे. त्यातच, स्थायी समितीवर गेल्या महिनाभरात कामांचे प्रस्ताव रोडावल्याने आगामी काळात स्थायीवरचे पद शोभेचे राहते काय, या भीतीपोटी अनेकांनी अगोदर शर्यतीत असूनही नंतर स्थायीवर यावर्षी सदस्य म्हणून जाण्यास नकार दर्शविला. त्यामुळे शिवसेनेसह कॉँग्रेस, राष्टवादीने बळजबरीने बोहल्यावर चढविले. मात्र, भाजपाने आयुक्तांना रोखण्यासाठी लढाऊ ब्रिगेडला पुढे चाल देण्याची रणनीती आखली असून त्याचा प्रत्यय बुधवारी स्थायीवरील नियुक्तीने दिसून आला आहे. भाजपाने सभागृहनेता दिनकर पाटील, उद्धव निमसे, भाग्यश्री ढोमसे आणि पुष्पा आव्हाड यांना स्थायीवर पाठविले आहे तर शिवसेनेने संतोष साळवे आणि संगीता जाधव यांना संधी दिली आहे. कॉँग्रेसने समीर कांबळे यांना चाल दिली आहे तर राष्टवादीकडून सुषमा पगारे यांच्या गळ्यात बळजबरीने सदस्यत्वाची माळ टाकण्यात आली आहे. दरम्यान, उर्वरित पाच सदस्यांचेही राजीनामे घेऊन त्याठिकाणी आक्रमक सदस्यांना नियुक्त केले जाण्याचे संकेत शहराध्यक्ष व आमदार बाळासाहेब सानप यांनी दिले आहेत.

Web Title:  BJP's warrior brigade on a standing committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.